इस्लामपूर येथे कोरोना योद्धा आशा सेविकांचा सत्कार सुनीता भाेसले-पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारख्या विषाणूने सर्व स्तरातील जीवन विस्कळीत केले असून, यामुळे सर्व स्तरातील लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेकांच्या घरातील जिवाभावाची माणसं या आजाराने दगावली आहेत. या दु:खातून एकमेकाला आधार देत आपण सर्वांनी पुन्हा उभे राहिले पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुल नेहमी तुमच्या सोबत राहील, अशी ग्वाही सुनीता निशिकांत भाेसले-पाटील यांनी दिली.
शहर भाजप महिला आघाडीच्यावतीने उरुण-इस्लामपूर शहरात कोरोनाच्या काळात काम केलेल्या आशा सेविका यांचा सत्कार सुनीता भाेसले-पाटील यांच्याहस्ते जीवनावश्यक साहित्याची भेट देऊन करण्यात आला. त्या म्हणाल्या, आशा सेविकांनी स्वत:सह स्वत:च्या कुटुंबातील घटकांचा विचार न करता या लढाईत जिवाची बाजी लावत कणखरपणे सेवा दिली. त्यांचे योगदान हा समाज कधीही विसरणार नाही. कोरोना काळातील आशा सेविकांचे काम कौतुकास्पद आहे.
महिला आघाडीच्या शहराध्यक्षा स्मिताताई पवार यांनी स्वागत केले. यावेळी नगरसेविका मंगल शिंगण, अश्विनी पाटील, पुनम शिर्के, रेश्मा कांबळे, माधुरी पाटील उपस्थित होत्या.