सांगलीत महापौरांच्या घरावर महिलांचा मोर्चा

By Admin | Updated: September 13, 2016 00:51 IST2016-09-12T23:55:06+5:302016-09-13T00:51:17+5:30

पाण्यासाठी आंदोलन : शिकलगार यांना घेराव

Women's Front at Sangliat Mayor's House | सांगलीत महापौरांच्या घरावर महिलांचा मोर्चा

सांगलीत महापौरांच्या घरावर महिलांचा मोर्चा

सांगली : शहरातील शामरावनगरमध्ये गेल्या महिन्याभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याविरोधात सोमवारी महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांच्या घरावर धडक दिली. तब्बल तासभर या महिलांनी महापौरांना घेराव घालून जाब विचारला. अखेर शहराच्या इतर भागातील पाणीपुरवठा कमी करून शामरावनगर परिसरात सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
शामरावनगर परिसर हा महापौर शिकलगार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या परिसरातूनच नागरी सुविधांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यापूर्वी पावसाळ्यात चिखल, साचलेले पाणी यावरून नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. त्यात आता अपुऱ्या पाणीपुरवठ्याची भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून मॉडर्न कॉलनी गल्ली एक ते तीन, ज्ञानेश्वर कॉलनी, सुंदर कॉलनी, विश्वविजय चौक या परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दिवसभरात केवळ अर्धा तासच पाणी सोडले जाते. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर सोमवारी या परिसरातील शंभरहून अधिक महिलांनी सकाळी सात वाजता थेट महापौर शिकलगार यांचे घर गाठले. महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल महिलांनी महापौरांना धारेवर धरले. तब्बल तासभर या महिलांनी महापौरांना घेराव घातला होता. शिकलगार यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना बोलावून घेतले.
या परिसराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल उपाध्ये यांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर महापौर शिकलगार व उपाध्ये यांनी शामरावनगर परिसराची पाहणी केली. त्यानंतर शहराच्या इतर भागातील पाणीपुरवठा कमी करून सायंकाळी या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. (प्रतिनिधी)


टाकी तयार, पाणी नाही
शामरावनगरमधील हा परिसर हिराबाग पाण्याच्या टाकीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या शेवटच्या टोकाला हा परिसर असल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. महापालिकेने कोल्हापूर रोड व हनुमाननगर या दोन ठिकाणी नवीन टाकी उभारली आहे. पण ७० एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र अपुरे असल्याने नवीन टाकीला अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्यापासून वंचितच आहेत.

Web Title: Women's Front at Sangliat Mayor's House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.