दीडशेवर महिलांचे केसपेपर गायब
By Admin | Updated: October 19, 2014 23:00 IST2014-10-18T23:58:22+5:302014-10-19T23:00:22+5:30
गर्भपात प्रकरण : लाडेला पोलीस कोठडी; सहाय्यक फरारीच

दीडशेवर महिलांचे केसपेपर गायब
सांगली/कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील ‘शतायू’ या खासगी रुग्णालयात झालेल्या २२० गर्भपात प्रकरणातील दीडशे महिलांचे केसपेपर गायब असल्याची माहिती चौकशीत पुढे आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले. दरम्यान, अटकेत असलेल्या डॉ. राम लाडे यास न्यायालयाने २१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मेंढे यांनी सांगितले की, लाडे यांनी गर्भपात करण्यासाठी शासनाची रितसर परवानगी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गर्भपात करण्यासाठी महिला डॉक्टर गिड्डे यांची नियुक्ती केली होती; मात्र गिड्डे या कधीच गर्भपात करण्यास रुग्णालयात गेल्या नाहीत, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. जे रेकॉर्ड जप्त केले आहे, त्यावरून २२० महिलांचे गर्भपात केले आहेत. मात्र यातील केवळ ७० केसपेपर सापडले आहेत. उर्वरित दीडशे केसपेपर गायब आहेत. ते कुठे गेले? याचाही उलगडा केला जाईल.
महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून प्रत्येक दोन महिन्याला शासनमान्य खासगी गर्भपात केंद्राची तपासणी केली जाते. त्यानुसार या पथकाने लाडे यांच्या गर्भपात केंद्राचीही तपासणी केली आहे. मात्र प्रत्येक तपासणीत या पथकाने लाडे यांच्या केंद्रातील रेकॉर्ड अपडेट असल्याचा शेरा मारला आहे. कित्येकदा या पथकाने दोन महिन्यांऐवजी पाच महिन्यांनी रेकॉर्डची तपासणी केली असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान, अटकेत असलेल्या लाडेला शनिवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)