चोरट्याच्या हिसड्याने महिला जखमी

By Admin | Updated: December 25, 2016 23:48 IST2016-12-25T23:48:39+5:302016-12-25T23:48:39+5:30

सांगलीतील घटना : गळ्याला जखम; गंठण न तुटल्याने चोरटे पसार

Women injured by thieves | चोरट्याच्या हिसड्याने महिला जखमी

चोरट्याच्या हिसड्याने महिला जखमी

सांगली : चालत निघालेल्या महिलेचे सोन्याचे गंठण ‘धूम’ टोळीने लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण गंठण न तुटल्याने चोरटे तसेच पसार झाले. गंठण ओढताना जोराचा हिसडा दिल्याने गळ्याला जखम होऊन ही महिला जखमी झाली आहे. आंबेडकर रस्त्यावर रविवारी सकाळी ही घटना घडली. मात्र या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.
‘सिव्हिल’ चौक परिसरातील महिला सकाळी नऊ वाजता मुख्य बस स्थानकाकडे निघाली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन २५ ते ३० वयोगटातील तिघे आले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील गंठणला हात घालून हिसडा मारला. पण एका हिसक्याने ते तुटले नाही. त्यामुळे चोरट्याने आणखी एक हिसडा मारला. तरीही त्यांना ते मिळाले नाही. पण महिलेच्या गळ्याला जोराची ओढ बसल्याने जखमही झाली.
तिने आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी बस स्थानकाच्या दिशेने पलायन केले. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळही कमी होती. परिसरातील लोक जमा झाले. या महिलेस पाणी देण्यात आले. तिला रुग्णालयात नेण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. पण महत्त्वाचे काम असल्याचे सांगून ती तेथून निघून गेली.
या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, पोलिसांनी तक्रार देण्यास संबंधित महिला आली नाही, त्यामुळे कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Women injured by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.