इस्लामपुरातून महिला आरोपीचे पलायन
By Admin | Updated: June 12, 2016 01:23 IST2016-06-12T01:23:57+5:302016-06-12T01:23:57+5:30
मासिक धर्माचा बहाणा : पोलिस ठाण्यातील घटना; महिला कोल्हापूरची

इस्लामपुरातून महिला आरोपीचे पलायन
इस्लामपूर : सोन्याचे दागिने लुबाडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या कोल्हापूरच्या संशयित महिलेने मासिक पाळी आल्याचा बहाणा करीत थेट पोलिस ठाण्यातून धूम ठोकली.
या घटनेनंतर कामगिरीवरील महिला पोलिसांनी आरडाओरडा करेपर्र्यंत ही महिला पसार झाली होती. शनिवारी पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर हादरलेल्या पोलिसांनी तिन्ही जिल्ह्यांची नाकाबंदी करीत तातडीने शोधमोहीम राबविली. मात्र, ही संशयित महिला हाती लागली नाही.
पूनम संतोष माने (वय २०, रा. रेल्वे स्टेशनजवळ, कोल्हापूर) असे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. ६ जून रोजी ही महिला इस्लामपूर बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन कामेरी येथील एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरत असताना, अवधूत हंगवाळे, सचिन कनप या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला रंगेहात पकडले होते. त्यानंतर येथील न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची ही मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिची सांगलीच्या जिल्हा कारागृहात रवानगी केली होती.
पूनम माने रेकॉर्डवरील संशयित महिला असल्याने तिला पुन्हा दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यावेळी तिच्या वकिलांनी आधारकार्ड हजर करीत वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. न्यायालयाने पूनम माने हिच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले.
त्यानुसार दंतवैद्यक वगळता इतर चाचण्या शुक्रवारी करण्यात आल्या. शनिवारी तिची दंतवैद्यक तपासणी करण्यात येणार होती. या दरम्यान पहाटे पावणेतीनच्या सुमारास पूनम माने हिने कामगिरीवरील महिला पोलिसाकडे, आपणास मासिक पाळी सुरू झाल्याचे सांगितले. ही महिला पोलिस तिला घेऊन प्रसाधनगृहाकडे जात असताना, तिने पुन्हा कापडाची मागणी केली. महिला पोलिस कापड शोधण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून पूनमने पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूने धूम ठोकली. हा प्रकार लक्षात येताच महिला पोलिसांनी आरडाओरडा केला. मात्र वीजपुरवठा नसल्याने, अंधाराचा फायदा घेत पूनम पसार झाली.
या गंभीर घटनेची रात्रगस्तीवरील पोलिसांसह वरिष्ठांना माहिती देण्यात आली. तातडीने सगळीकडे नाकाबंदी करून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, ही महिला सापडली नाही. सांगलीहून आलेल्या बिल्लू श्वानाने पोलिस ठाण्याच्या पाठीमागून पोलिस वसाहत, मंत्री कॉलनी, वाकळे वखारमार्गे यल्लम्मा चौक, सावकार कॉलनीतून पेठ-सांगली रस्त्यापर्यंत माग काढला. महिलेच्या शोधासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तपासपथके रवाना करण्यात आली आहेत. तिच्याविरुद्ध पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संगीता पाटील अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)