'त्या' महिलेचा खून १0 हजारांसाठी
By Admin | Updated: October 23, 2014 23:05 IST2014-10-23T22:57:21+5:302014-10-23T23:05:57+5:30
अनैतिक संबंध : शेतमालकानेच काढला काटा; संशयितास अटक

'त्या' महिलेचा खून १0 हजारांसाठी
सांगली : कासेगाव (ता. वाळवा) येथील अरुणा ठोंबरे या शेतमजूर महिलेच्या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या २४ तासात लावला. शेतमालक सुधाकर केरु शीद (वय ४८, रा. कासेगाव) यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला आज, गुरुवारी पहाटे अटक केली आहे. अरुणाशी माझे अनैतिक संबंध होते, ती नेहमी पैसे मागायची, दिवाळीसाठी दहा हजार रुपये द्यावेत, यासाठी तिने तगादा लावला होता. त्यामुळे तिचा खून केल्याची कबुली संशयित शीद याने दिली आहे.
अरुणा ठोंबरे या शीद याच्या शेतात मजुरीचे काम करीत होत्या. शीदचे पाच एकर शेत आहे. शेतात जनावरांचा गोठा आहे. जनावरांना चारा टाकणे व गोठ्याची स्वच्छता करण्याचे काम त्या करीत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत काम करून त्या घरी जात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे शीद याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. शीदकडून त्या पैसेही घेत. गेल्या काही महिन्यांत अरुणा यांचे पैसे मागण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या दोघांत भांडण सुरू झाले होते. दिवाळीसाठी अरुणा यांनी त्याच्याकडे दहा हजाराची मागणी केली. शीदने २५ आॅक्टोबरला पैसे देतो, असे सांगितले. तोपर्यंत दिवाळी संपणार असल्याने अरुणा यांनी दोन दिवसांत पैसे पाहिजेत, असे सुनावले होते.
सोमवारी दुपारी त्यांच्यात पैशांवरून कडाक्याचे भांडण झाले. ‘उद्या (मंगळवार) मी कामाला येणार नाही’, असे सांगून त्या निघून गेल्या. मात्र, तरीही त्या मंगळवारी नेहमीप्रमाणे चार वर्षांच्या नातीला घेऊन कामावर आल्या होत्या. त्या कामावर आल्या आहेत का नाही, हे पाहण्यासाठी शीद दुपारी शेतात गेला होता. जनावरांच्या गोठ्याजवळ अरुणा यांची नात बसली होती. शीदने तिला आजी कुठे आहे, अशी विचारणा केली. तिने आजी वैरण आणण्यासाठी उसाच्या फडाकडे गेली असल्याचे सांगितले. तो तातडीने तिकडे गेला. त्यांच्यात तेथे पुन्हा पैशांवरून खडाजंगी झाली. यामुळे संतापलेल्या शीदने अरुणा यांचे डोके पाठीमागून धरून ते चिखलात दाबले. प्रतिकार करण्याची संधीही दिली नाही. अरुणा मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर तो तेथून निघून गेला. (प्रतिनिधी)
तो मी नव्हेच...
शीदने दिवाळीनिमित्त गावात फटाक्यांचा स्टॉल लावला आहे. खून केल्यानंतर तो घरी गेला. हात-पाय धुऊन, कपडे बदलून तो स्टॉलवर जाऊन बसला. रात्री आठ वाजले तरी अरुणा घरी गेल्या नव्हता. यामुळे त्यांचा मुलगा अमोल चौकशीसाठी शीदकडे गेला. शीदने त्याला, ‘शेतात उसाजवळ असेल की’, असे उत्तर दिले. ग्रामस्थ शोध घेण्यासाठी शेतात जात असताना तोही त्यांच्यासोबत गेला होता. त्यावेळी त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याचे कृत्य चव्हाट्यावर आले.
नातीची मदत : सावंत
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले की, घटनेदिवशी शेतात अरुणा यांची नात हजर होती. शेतात कोण आले आणि कोण गेले, याची तिला माहिती होती. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली, त्यावेळी शीदशिवाय कोणीच येऊन गेले नसल्याचे समजले. तसेच त्याचे अरुणाशी संबंध असल्याची माहिती गावातून मिळाली होती. यामुळे त्याच्याकडे चौकशीचा ससेमिरा लावला. केवळ नातीमुळेच धागेदोरे हाती लागले. यामध्ये तिला साक्षीदार केले जाणार आहे.