किल्ले मच्छिंद्रगड येथे दुचाकीवरून पडल्याने महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:43+5:302021-08-29T04:26:43+5:30

इस्लामपूर : इस्लामपुरातून पती, मुलगा आणि सुनेसमवेत दुचाकीवरून देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचा किल्ले मच्छिंद्रगड येथे चक्कर येऊन दुचाकीवरून पडल्याने ...

Woman killed after falling from two-wheeler at Fort Machhindragad | किल्ले मच्छिंद्रगड येथे दुचाकीवरून पडल्याने महिला ठार

किल्ले मच्छिंद्रगड येथे दुचाकीवरून पडल्याने महिला ठार

इस्लामपूर : इस्लामपुरातून पती, मुलगा आणि सुनेसमवेत दुचाकीवरून देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचा किल्ले मच्छिंद्रगड येथे चक्कर येऊन दुचाकीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. डोंगरउतारावर रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी अँगलवर डोके आदळल्याने ही घटना घडली. हा अपघात शुक्रवारी (दि. २७) दुपारी चार वाजता झाला. रुक्मिणी विजय खिलारे (वय ५५, रा. इंदिरानगर, इस्लामपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत विजय रामचंद्र खिलारे (६२) यांनी इस्लामपूर पोलिसांत वर्दी दिली आहे.

खिलारे पती-पत्नी व त्यांचा मुलगा आणि सून असे चौघे दोन दुचाकीवरून सकाळी देवदर्शनासाठी घरातून बाहेर पडले. हे दाम्पत्य दुचाकीवर (एमएच १० डीबी ६७८७) बसले होते; तर मुलगा सूर्यकांत आणि सून दीपाली दुसऱ्या दुचाकीवर होते. कऱ्हाड तालुक्यातील धानाई (कार्वे) येथील दर्शन आटोपून दुपारी ते किल्ले मच्छिंद्रगड येथील मच्छिंद्रनाथ मंदिरात आले.

देवदर्शन झाल्यानंतर खिलारे पती-पत्नी गडावरून खाली येत होते. त्यांच्यापाठोपाठ मुलगा आणि सून दुचाकीवर होते. गडावरून उतरत असताना तिसऱ्या वळणावर रुक्मिणी यांना चक्कर आली. पती विजय यांना तसे सांगत असतानाच त्या खाली कोसळल्या. वळणावरील संरक्षक लोखंडी अँगलवर डोके आदळल्याने रक्तबंबाळ होऊन त्या निपचित पडल्या. यावेळी दुचाकीवरील ताबा सुटल्याने विजय खिलारे खाली पडले. मात्र त्यांनी स्वतःला सावरले. रुक्मिणी यांना उठविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

फोटो : २८ रुक्मिणी खिलारे

Web Title: Woman killed after falling from two-wheeler at Fort Machhindragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.