निंबवडे फाट्यानजीक अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:58+5:302021-02-05T07:19:58+5:30
दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची-मायणी मर्गावर निंबवडे फाट्यानजीक चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला उलटली. यात एक महिला जागीच ...

निंबवडे फाट्यानजीक अपघातात महिला ठार
दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची-मायणी मर्गावर निंबवडे फाट्यानजीक चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला उलटली. यात एक महिला जागीच ठार झाली; तर तिघे जण जखमी झाले. छाया अंकुश मेहर (वय ४०, रा. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
अपघात मृत महिलेचे पती अंकुश भगवान मेहर (वय ४५), मुलगा अविनाश (२३) व मुलगी आरती (२०) हे जखमी झाले आहेत. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
कुर्डूवाडी येथील रहिवासी असणारे मेहर कुटुंबीय कराड येथून कुर्डूवाडीकडे मोटारीने (क्र. एम. एच. ४५. ए. डी. ८४४२) निघाले होते. यावेळी अंकुश मेहर हे गाडी चालवत होते. दिघंची-मायणी रस्त्यावर दिघंचीपासून अवघ्या सहा किमी अंतरावर निंबवडे फाट्यानजीक गाडी आली असता अचानक एक जणावर आडवे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक अंकुश यांचा मोटारीवरील ताबा सुटला आणि मोटार रस्त्याच्या कडेला उलटली. मोटारीने तीन ते चार पलट्या खाल्ल्याने यात छाया मेहर यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंकुश, अविनाश व आरती हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मोटारीबाहेर काढून तत्काळ आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात मोटारीचेही मोठे नुकसान झाले. घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
फोटो-२४ दिघंची व १.२