भिंत कोसळल्याने बहिणी जखमी
By Admin | Updated: July 19, 2014 23:22 IST2014-07-19T23:20:13+5:302014-07-19T23:22:55+5:30
प्रकृती स्थिर : हिंगणगावखुर्दची घटना

भिंत कोसळल्याने बहिणी जखमी
सांगली : घराची भिंत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून सख्ख्या बहिणी जखमी झाल्या. हिंगणगावखुर्द (ता. कडेगाव) येथे आज (शनिवार) दुपारी ही घटना घडली. श्रावणी चंद्रकांत मोहिते (वय ७) व सलोनी चंद्रकांत मोहिते (४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रावणी पहिले शिकते, तर सलोणी अंगणवाडीत आहे. दोघीही दुपारी त्यांच्या राहत्या घरी एका खोलीत अभ्यास करीत बसल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे त्यांची दगडमातीची भिंत ओली झाली होती. यामुळे ती अचानक कोसळली. यामध्ये त्या अडकल्या गेल्या. भिंत कोसळली त्यावेळी घरातील लोक दुसऱ्या खोलीत बसले होते. ते धावत आले. त्यावेळी या दोघीही ढिगाऱ्याखाली सापडल्या होत्या. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली होती. दोघींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. सायंकाळी सांगलीला हलविण्यात आले. (प्रतिनिधी)