घोलेश्वरात शेळ्या, मेंढ्यांवर लांडग्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:08+5:302021-06-18T04:19:08+5:30
सख : घोलेश्वर (ता. जत) येथील सैनाप्पा गुंडा तांबे (रा. तांबेवाडी) यांच्या घराशेजारील कोंंडवाड्यातील शेळ्या, मेंढ्यावर तीन लांडग्यांनी ...

घोलेश्वरात शेळ्या, मेंढ्यांवर लांडग्याचा हल्ला
सख : घोलेश्वर (ता. जत) येथील सैनाप्पा गुंडा तांबे (रा. तांबेवाडी) यांच्या घराशेजारील कोंंडवाड्यातील शेळ्या, मेंढ्यावर तीन लांडग्यांनी हल्ला केला. यामध्ये दोन बोकड, एक पाटीचा मृत्यू झाला. यामध्ये ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटे तीन वाजता घडली.
घोलेश्वर येथील उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावरील तांबेवाडी येथे राहणारे सैनाप्पा गुंडा तांबे यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. बुधवारी रानात जनावरांना चाऱ्यासाठी हिंडवून सायंकाळी घराशेजारील कोंडवाड्यात घातले. जेवण करून ते झोपी गेले.
रात्री रिमझिम पाऊस असल्याने ते घरात झोपले होत. पहाटे तीन वाजता तीन लांडग्यांनी कोंडवाड्यात घुसून हल्ला केला. यामध्ये सहा महिन्यांचे दोन बोकड, पाटींवर हल्ला केला. या हल्ल्यात बोकड, पाटीचा मृत्यू झाला.
शेळ्यांच्या आवाजाने सैनाप्पा यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन आरडाओरडा केला. कुत्र्याने पाठलाग केल्याने तीन लांडग्यांनी पलायन केले. सकाळी त्यांनी वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी शेगाव विभागाचे वनपाल प्रकाश गडदे, वनरक्षक एम. एम. मुसळे, पशुवैद्यकीय डॉ. खांडेकर, तलाठी स्वप्निल घाडगे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
लांडग्यांचा हल्ला कायमचा
पूर्व भागात पवनचक्की डोणच्या भागात उभारल्याने तेथील लांडग्यांचे स्थलांतर इतर भागात झाले आहे. व्हस्पेठ, कोळगिरी, सनमडी, मायथळ, दरीकोणूर, गुड्डापूर, घोलेश्वर, सोरडी, शेड्याळ, तोळबळीवाडी या परिसरांत लांडग्यांचे हल्ले वारंवार होत आहेत. याचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे.
कोट
लांडग्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या मेंढपाळास वनसंरक्षक नियमाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पशुपालकांना निश्चित मदत मिळेल.
- प्रकाश गडदे, वनपाल, शेगाव विभाग.