‘एलसीबी’ कार्यालयाविना

By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T23:41:53+5:302015-11-04T00:08:27+5:30

इचलकरंजीतील प्रकार : कार्यालय तात्पुरते हलवले यड्रावला

Without the 'lcb' office | ‘एलसीबी’ कार्यालयाविना

‘एलसीबी’ कार्यालयाविना

अतुल आंबी--इचलकरंजी--येथील जुन्या केईएम रुग्णालयाच्या मागील बाजूच्या इमारतीचा वरील मजला इचलकरंजी न्यायालयाला भाडे करारावर देण्यात आला आहे. त्यामुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कार्यालय तात्पुरते यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत हलवावे लागले आहे. यामुळे या पथकाची आता कार्यालयासाठी जागेची शोधमोहीम सुरू झाली आहे. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून कार्यालयाला जागा द्यावी, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलामार्फत शहापूर परिसरात एक नव्याने पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा असा विस्तार करण्यात आला आहे. शहापूर पोलीस ठाण्यालाही स्वत:ची जागा न मिळाल्याने सध्या इंडस्ट्रियल इस्टेटच्या खोल्या भाड्याने घेऊन त्याठिकाणी पोलीस ठाणे चालविले जात आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यांच्याही कार्यालयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या केईएम रुग्णालयाच्या पाठीमागील इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर त्यांना तात्पुरते कार्यालय दिले होते.
न्यायालयाच्या विस्तारामुळे न्यायालयाने या परिसरातील नगरपालिकेची इमारत भाडेकरारावर मागितली होती. त्यानुसार नगरपालिकेने जुन्या केईएमई रुग्णालय इमारतीतील वरील मजला ३० आॅक्टोबरला भाडेकराराने न्यायालयाला दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक बंदोबस्त संपवून परत आलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मंगळवारी हे कार्यालय रिकामे करून द्यावे लागले.
या कार्यालयातील सर्व साहित्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी तात्पुरते यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत हलविले आहे. नवीन कार्यालयाचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच ससेहोलपट होत आहे. या कार्यालयाला येथेच जागा देण्यासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

गावभाग पोलीस ठाणे स्थलांतराच्या प्रतीक्षेत
येथील गावभाग पोलीस ठाण्यासाठी थोरात चौकातील पोलीस परेडच्या जागेवर नवीन पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. संपूर्ण काम पूर्ण झाले असून, स्वत:च्या जागेतील नवीन इमारतीत स्थलांतर होण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहे. सध्या हे पोलीस ठाणेही जुन्या केईएम रुग्णालयाच्या इमारतीतच आहे.

Web Title: Without the 'lcb' office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.