चर्चेविनाच अर्थसंकल्पास मंजुरी
By Admin | Updated: February 27, 2015 23:18 IST2015-02-27T22:28:14+5:302015-02-27T23:18:07+5:30
इस्लामपूर पालिका : ९८ कोटी ५४ लाखांचा अर्थसंकल्प; दहा मिनिटात सभा गुंडाळली

चर्चेविनाच अर्थसंकल्पास मंजुरी
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासाठीच्या २0१५-१६ च्या ९८ कोटी ५४ लाख १५ हजार १२३ रुपयांच्या अर्थसंकल्पाला सभागृहाने आज (शुक्रवारी) मंजुरी दिली. याचवेळी २0१४—१५ च्या ११0 कोटी ३३ लाखांच्या सुधारित अर्थसंकल्पालाही मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पावर कोणतीही चर्चा न होता केवळ दहा मिनिटात ही अर्थसंकल्पीय सभा गुंडाळण्यात आली. यामुळे पालिकेच्या अध्यायात आणखी एका विक्रमाची नोंद झाली.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत कोणतीही करवाढ नसलेला हा १0 लाख ९२ हजार ५४३ रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प दहा मिनिटांची खळखळ झाल्यानंतर सभागृहाने स्वीकारला. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी खुल्या नाट्यगृहाला माजी नगराध्यक्ष अशोकदादा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र दिल्याकडे लक्ष वेधत या विशेष सभेत तो विषय घ्यावा, असे मत मांडले.
सत्तारुढ गटाचे नगरसेवक खंडेराव जाधव, अॅड. चिमण डांगे यांनी त्याला आक्षेप घेत, विशेष सभेत अन्य कोणताही विषय घेतला जात नाही असे सुनावत, यापूर्वीच आपणही नामकरणासाठी प्रशासनाकडे पत्र दिल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यावर नगराध्यक्षांनीही अर्थसंकल्पीय सभा आहे, नंतरच्या सभेत त्यावर विचार करू, असे आश्वासन दिले.प्रभारी लेखापाल विजय टेके यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठीची अनुमती मागितल्यावर सत्तारुढ गटाचे ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांनी या अर्थसंकल्पाला हरकतीच्या मुद्यांद्वारे विरोध नोंदवून नगराध्यक्षांकडे हरकत सुपूर्द केली. त्यावर सभागृहात शांतता पसरली. मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी या हरकतींच्या मुद्यावर नजर फिरवून प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी हरकतींचे गांभीर्य पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना सांगितल्यावर त्यांनी बी. ए. पाटील यांच्या आसनाजवळ येऊन चर्चा केली. तुमच्या हरकती विचारात घेऊन अर्थसंकल्पात योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे विजयभाऊ पाटील यांनी स्पष्ट केल्यावर शेवटी बी. ए. पाटील यांनी सभागृहाचा मान ठेवत अर्थसंकल्प मंजूर करण्याची सूचना मांडली. त्याला चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिल्यावर सभागृहाने हे अंदाजपत्रक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. (वार्ताहर)
कोणतीही करवाढ नाही
या वर्षाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. अंदाजपत्रकात २0 कोटी ४७ लाखांची महसुली जमा आहे. ३५ कोटी ४ लाखांची भांडवली जमा, तर ३४ कोटी ३१ लाखांची असाधारण जमा आहे. तसेच २0 कोटी १४ लाखांचा महसुली खर्च, ७४ कोटी ७४ लाखांचा भांडवली खर्च आणि ३४ कोटी ८९ लाखांचा असाधारण खर्च गृहीत धरुन १0 लाख ९२ हजार ५४३ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सभागृहाने स्वीकारले.
आरोग्य विभागावरील दुहेरी खर्चाचा वाद
बी. ए. पाटील यांनी दिलेल्या हरकतींमध्ये आरोग्य विभागावर होणाऱ्या दुहेरी खर्चाचा गंभीर मुद्दा मांडला आहे. पालिकेचे आरोग्य विभागाकडील ७७ कर्मचारी विविध विभागात काम करतात. त्यांच्यावर १ कोटी ८६ लाख रुपये पगारावर खर्च होतात, तर स्वच्छता ठेक्यासाठी पुन्हा १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यावर आक्षेप घेतला आहे. आस्थापनेवर होणारा खर्च प्रमाणापेक्षा जास्त आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा, वाहनचालक ठेका, सुरक्षा रक्षक ठेका, पाणी पुरवठा विभागाचा ठेका, दिवाबत्ती दुरुस्ती ठेका, वृक्षारोपण अशा मुद्यांवर आक्षेप नोंदवला आहे.