जिल्ह्यातील आमदार ठरणार काही तासातच
By Admin | Updated: October 18, 2014 23:46 IST2014-10-18T23:46:20+5:302014-10-18T23:46:20+5:30
प्रशासन सज्ज : दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित, सात ठिकाणी होणार मतमोजणी

जिल्ह्यातील आमदार ठरणार काही तासातच
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होत आहे. जिल्ह्यातील सर्व निकाल दुपारी बारापर्यंत अपेक्षित आहेत.
मिरज व सांगली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी येथील मिरज रस्त्यावरील केंद्रीय शासकीय गोदामात होणार आहे. इस्लामपूरची मतमोजणी एम बी शासकीय अन्नधान्य गोदाम येथे, तर शिराळ्याची मतमोजणी आयटीआय शिराळा (पहिला मजला) येथे होत आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाची कडेगाव औद्योगिक वसाहतीतील आयटीआय महाविद्यालयात, खानापूरची विट्यातील खानापूर-विटा रस्त्यावरील शासकीय अन्नधान्य गोदाम, तासगाव-कवठेमहांकाळची तासगावच्या तहसील कार्यालयाजवळच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये आणि जतची मतमोजणी जतच्या शासकीय गोदाम येथे होत आहे.
सकाळी आठ वाजता मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. प्रारंभी टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. मतमोजणीच्या विधानसभा मतदारसंघनिहाय १९ ते २४ फेऱ्या होणार आहेत. मिरज, सांगली, तासगाव व इस्लामपूर मतदारसंघात २० फेऱ्या होणार आहेत. शिराळ्यासाठी २३ फेऱ्या, पलूस-कडेगाव व जत विधानसभेसाठी १९ फेऱ्या, तर खानापूरसाठी २४ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरी सर्वसाधारणपणे पंधरा मिनिटाची असेल. मतमोजणीसाठी जिल्ह्यात ८५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे काम १४ टेबलांवर केले जाणार असून, एक टेबल टपाली मतदानाच्या मोजणीसाठी निश्चित केले आहे. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)