टंचाई निधी रखडल्याने टेंभू योजना बंद
By Admin | Updated: February 19, 2015 23:41 IST2015-02-19T23:26:46+5:302015-02-19T23:41:15+5:30
राज्य सरकारकडून दुर्लक्ष : पाच कोटींच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित

टंचाई निधी रखडल्याने टेंभू योजना बंद
प्रताप महाडिक -कडेगाव - टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेचा वीज पुरवठा, पाच कोटींच्या थकित वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. यापैकी ३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी राज्य शासनाकडून टंचाई उपाययोजना निधीतून मिळणार आहे. शिवाय १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी शेतकऱ्यांच्या नियमित पाणीपट्टी वसुलीतून भरायची आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून ही पाणीपट्टी रक्कम कपात करुन तात्काळ भरण्याची व्यवस्था होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेला टंचाई उपाययोजना निधी कधी मिळणार?, असा संतप्त सवाल लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत.
टेंभू योजनेची टप्पा क्रमांक १ अ, १ ब तसेच शिवाजीनगर टप्पा क्रमांक २ मधील पाच कोटी इतकी वीजबिल थकबाकी आहे. या पट्ट्यांच्या लाभक्षेत्रात जवळपास ४ हजार २०० हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले जाते. योजनेचे यावर्षी एक आवर्तन पूर्ण क्षमतेने दिले आहे. या एका आवर्तनाची १ कोटी ७५ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच वसूल होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेल्या निधीचे काय?
आता टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची वीजबिल थकबाकी असल्यामुळेच योजना बंद आहे. शासनाने टेंभू योजनेत ३ कोटी १५ लाख रुपये इतकी टंचाई काळातील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. याशिवाय ताकारी आणि म्हैसाळचीही तरतूद केली आहे. परंतु प्रत्यक्ष रक्कम जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे वर्ग होण्यास विलंब होत आहे. पहिल्या आवर्तनावेळी सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळीच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी, टंचाई काळातली थकबाकी लवकरच भरणार आहोत, असे हमीपत्र महावितरणला दिले होते. परंतु अद्याप ही रक्कम प्राप्त झालेली नाही.
शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी तात्काळ वसूल होते. मात्र शासनच त्यांच्याकडील निधी देण्यास विलंब करीत आहे. यामुळे टेंभू योजना बंद आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन टंचाई उपाययोजना निधीची रक्कम संबंधित योजनेकडे तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत
आहे.
टेंभू योजनेची शेतकऱ्यांकडे अडकलेली १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी महावितरणने भरुन घ्यावी आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा. शासनाकडे अडकलेली टंचाई काळातील थकबाकी मिळणार आहे, तसे हमीपत्रही घेतले आहे. आता याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. उन्हाची तीव्रता वाढत आहे. पिके कोमेजू लागली आहेत. पाणी त्वरित मिळाले नाही, तर पिके करपतील, अशी वस्तुस्थिती टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात दिसत आहे.
स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू
टेंभू योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली, तसेच आवर्तनाचे व्यवस्थापन आदी कामे सुरळीत व पारदर्शक व्हावीत म्हणून योजनेचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू केला आहे. याचे विभागीय कार्यालय ओगलेवाडी येथे, तर उपविभागीय कार्यालय कडेपूर येथे सुरू होत आहे. लाभक्षेत्र वाढले की पाणीपट्टी आकारणी कमी होते. शेतकऱ्यांनी आपल्या लाभक्षेत्राची माहिती प्रामाणिकपणे योजनेकडे देणे गरजेचे आहे.