विटा : कोविडची दुसरी लाट सुरू असून खेडोपाडी अत्यंत दयनीय अवस्था आहे. खेडाेपाडी व्यवसाय ठप्प असल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत महावितरणने ग्रामपंचायतीला नळपाणी पुरवठा योजनेच्या व पथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजजोडणी तोडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. अशा वेळी अत्यावश्यक सेवा म्हणून पाणी योजनांना सवलत देणे गरजेचे असताना, महावितरणने अन्यायकारक नोटिसा दिल्या आहेत. त्या थकबाकीच्या नोटिसा तत्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आमदार अनिल बाबर यांनी दिला आहे.
बाबर म्हणाले, गेली दोन वर्षे कोविडचे संकट आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींना वसुली करणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत महावितरणने पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची वीजजोडणी तोडण्याच्या दिलेल्या नोटिसा अत्यंत चुकीच्या आहेत.
महावितरणच्या पुणे व मुंबईत बसलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील भीषण वास्तवाची कल्पना नसल्याने असे निर्णय घेतले जातात; परंतु, असे निर्णय घेत असताना कोविडच्या संकटाचा विचार करणे आवश्यक होते. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, यासाठी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट आहे, असा निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आमदार अनिल बाबर यांनी दिला.
फोटो – आमदार अनिल बाबर यांचा वापरणे.