विट्यात भरदिवसा दागिने पळविले
By Admin | Updated: January 31, 2016 00:46 IST2016-01-31T00:34:53+5:302016-01-31T00:46:01+5:30
दोन घटना : दुचाकीस्वारांचे कृत्य

विट्यात भरदिवसा दागिने पळविले
विटा : विटा येथे खानापूर रस्त्यावर पंचशीलनगर व लेंगरे रोडवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाऊण तासाच्या फरकाने दोन विवाहितांच्या गळ्यातील सुमारे ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. ही घटना शनिवारी सकाळी १०.४५ आणि ११.३० वाजता घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
विटा येथील लेंगरे रस्त्यावर राहणाऱ्या सौ. छाया दीपक पटेल (वय २८) या त्यांची मुलगी सृष्टी व पुतणी प्राची यांना प्राथमिक शाळेत सोडण्यासाठी सकाळी १०.४५ वाजता लेंगरे रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या आलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन जणांनी दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने सौ. छाया यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे गंठण हिसडा मारून लंपास केले.
हणमंतनगर येथील सौ. उषा विकास सपकाळ (वय २६) पंचशीलनगर येथे मैत्रीण अर्चना पवार यांच्या घरी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जात होत्या. त्याच्यासोबत शेजारी राहणाऱ्या सौ. मीना हसबे होत्या. या दोघी खानापूर रस्त्याने जात असताना पंचशीलनगरनजीक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी सौ. उषा यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व २० हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असे एकूण एक लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे व उपनिरीक्षक अमोल शिंदे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)