आरोग्य सेविकेकडून वायरमनला थप्पड
By Admin | Updated: November 22, 2014 00:00 IST2014-11-21T23:17:55+5:302014-11-22T00:00:55+5:30
तोंडोलीत घटना : वीज तोडण्याचा वाद

आरोग्य सेविकेकडून वायरमनला थप्पड
तोंडोली : तोंडोली (ता. कडेगाव) येथील आरोग्य सेविकेने वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वायरमनच्या श्रीमुखात भडकावल्यामुळे तोंडोली गावात चांगलेच वातावरण तापले आहे.
तोंडोली येथील आरोग्य केंद्राचे १३00 रुपये वीज बिल थकित असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वायरमनने गुरुवार दि. २0 नोव्हेंबर रोजी आरोग्य केंद्राचे वीज कनेक्शन तोडले. याचा राग मनात धरुन या आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेने या वायरमनच्या श्रीमुखात लगावून त्याला चांगलीच मारहाण केली. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली होती.
वीज वितरण कंपनीचा हा वायरमन कडेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेला होता. परंतु गावातील काही लोक व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलीस स्टेशनच्या बाहेरच मिटविले. वायरमनला ‘तू बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला आहेस. पुढे पोलिस केस झाली तर तुला इकडे हेलपाटे मारावे लागतील’, असे सांगून या प्रकरणावर पोलीस स्टेशनच्या बाहेरच पडदा टाकण्यात आला. आरोग्य सेविकेनेही माफीनामा दिला. (वार्ताहर)
माफीनाम्याने पडदा
गेली अनेक वर्षे ही आरोग्य सेविका गावात ठाण मांडून आहे. या आरोग्य सेविकेविषयी गावातील अनेक लोकांच्या तक्रारी असून, तिच्या बदलीविषयी ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला होता. आलेल्या रुग्णांना या आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळत नसल्याचेही अनेक ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. या आरोग्य सेविकेने झालेल्या प्रकाराबद्दल कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये माफीनामा लिहून दिला आहे.