तारांशी खेळणारी ‘वायर वुमन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:48+5:302021-03-07T04:22:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विजेच्या उंच खांबावर वायरींच्या जंजाळात हात घालून विद्युत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याच्या कामात आजवर ...

‘Wire Woman’ playing with stars | तारांशी खेळणारी ‘वायर वुमन’

तारांशी खेळणारी ‘वायर वुमन’

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विजेच्या उंच खांबावर वायरींच्या जंजाळात हात घालून विद्युत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याच्या कामात आजवर पुुरुषांची मक्तेदारी राहिली. या मक्तेदारीला मोडीत काढून स्त्रीसुद्धा तितक्याच चिकाटीने, तत्परतेने व हिमतीने हे काम करु शकते, हे सांगलीच्या पूनम सुहास जाधव यांनी दाखवून दिले. त्यामुळे तारांशी खेळणारी ही ‘वायर वुमन’ सांगलीकरांसाठी कौतुकाचा व अभिमानाचा विषय ठरली आहे.

पूर्वाश्रमीच्या पूनम किसन चव्हाण यांची घरची परिस्थिती बेताची होती. वडील फूड पॅकेजिंगचे काम करत होते, आई गणेशमूर्ती बनणाऱ्या कारखान्यात मूर्ती साकारण्याचे काम करत असे. सातवीत शिकत असतानाच पूनम यांच्या वडिलांचे निधन झाले. पूनम यांना एक बहीण व तिच्या पाठीवर एक भाऊ असल्याने त्यांच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्यावर व आईवर आली. त्यामुळे पूनमने दहावीनंतर नोकरीच्या अपेक्षेने आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला. त्यानंतर लगेच प्रशिक्षणार्थी व नंतर महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम मिळाले. सुरुवातीला या कामाबद्दल थोडी भीती त्यांच्या मनात होती. मात्र, काम करायची जिद्द असल्याने त्यांनी चिकाटीने हे काम अवगत केले. शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात दुरुस्तीसाठी त्या गेल्यानंतर लोकांना त्यांचे कौतुक वाटते. पती सुहास जाधव हे महावितरणसाठी आऊटसोर्सिंगचे काम करतात. मात्र, त्यांनी नेहमी पूनम यांना याकामी प्रोत्साहन दिले. घरची जबाबदारी सांभाळून तारांशी भिडण्याचे काम त्या करत असतात. त्यांच्या कर्तृत्वाचे हे पाऊल अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असते. कोणतेही काम छोटे नसते, त्यामुळेच मोठ्या हिमतीने पूनम यांनी या कामाला महिलांच्या दुनियेतही प्रतिष्ठेचे बनवले आहे.

Web Title: ‘Wire Woman’ playing with stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.