शिराळ्यात बोगस बचत गटांचे जाळे
By Admin | Updated: November 9, 2016 22:46 IST2016-11-09T22:46:52+5:302016-11-09T22:46:52+5:30
फायनान्स कंपन्यांचा सुळसुळाट : कर्जाच्या हप्त्यांमुळे महिलांवर तणाव, अनेक कुटुंबांचे स्थलांतर

शिराळ्यात बोगस बचत गटांचे जाळे
विकास शहा ल्ल शिराळा
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हा उद्देश ठेवून शासनाकडून महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. त्यांना उद्योगधंद्यांसाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना अनेक आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मोठी मदत होते. मात्र हा बचत गटाचा उद्देश दूर राहून याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक गरज ओळखून तालुक्यात जवळपास १७ ते १८ फायनान्स कंपन्यांनी शिरकाव केला असून, त्याचे जाळे जवळपास संपूर्ण तालुक्यात पसरलेले आहे.
हे सुरू असलेले बचतगट कायदेशीर आहेत का? त्यांची व्याजदराची आकारणी कोणत्या निकषावर केली जाते? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून वार्षिक २ टक्के व्याजदराने शासनाकडून महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गाच्या अनेक समस्या दूरही झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न तोकडे असल्याने अनेक कुटुंबांनी बचत गटांचे कर्ज घेतले आहे. या कर्जामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदतही झाली आहे. या शासनाकडून घेतलेले कर्ज हे कमी व्याजदराने व या कर्जाचा हप्ता महिन्याला हप्ता असतो. ज्याचे कर्ज कमी आहे, त्या महिला आपला हप्ता कसाबसा देऊ शकतात, मात्र ज्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे.
ग्रामीण भागातील महिला वर्ग या बचत गटांचे हप्ते फेडण्यासाठी त्यांना मोठ्या तणावाखाली राहावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या कर्जापैकी काही कर्जाचे हप्ते आठवड्याला, तर काही कर्जाचे हप्ते १० व १५ दिवसाला घेतले जातात व जर एखाद्या महिलेला ठरल्याप्रमाणे हप्ता दिला नाही, तर त्या बचत गटात जेवढ्या महिला आहेत, त्या महिलांवर तो हप्ता भरून काढण्याची जबाबदारी असते. त्यामुळे महिला त्या महिलेच्या घरी जाऊन बसतात व हप्ता वसूल करतात. मात्र ज्या कंपनीने कर्ज वाटप केले आहे, ते बिनधास्त असतात.
खासगी फायनान्स कंपन्यांनी तसेच सहकारी संस्थांनी ग्रामीण भागात सुरू असलेले बचत गट केवळ एक छायाचित्र आणि रेशन कार्डच्या झेरॉक्सवर पैसे वाटप करतात. तोकड्या कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी विविध बचत गटांचे पैसे उचलले आहेत. परंतु त्यांची परतफेड करताना मात्र महिलांना मोठ्या तणावाखाली राहावे लागत आहे. या तणावामुळे अनेक महिलांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या तालुक्यात जवळपास १८ विविध फायनान्स कंपन्यांचे बचत गट कार्यरत आहेत व प्रत्येकाचे व्याज दर वेगवेगळे आहेत.
बहुतांशी रोजगार करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या महिलाच मोठ्या प्रमाणात अशा विविध बचत गटांच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
ज्या महिला अशा बचत गटांच्या विळख्यात अडकल्या आहेत, या बचत गटांच्या परतफेडीची धास्ती लागून राहिली आहे.
या तणावामुळे अनेक कुटुंबांनी गाव सोडून जाणे पसंत केले आहे. कारण हप्ता वसूल करण्यासाठी ही मंडळी सकाळी ७ वाजताच आपला अड्डा गावात मांडतात. रात्री दहा वाजेपर्यंत हप्ते गोळा केले जातात. हप्ता न दिल्यास गटातील महिलांचा मोर्चा संबंधित महिलेच्या घराकडे वळवतात व वेळ पडल्यास दमदाटी करून पैसै वसूल केले जातात. त्यातूनही पैसे नाही मिळाले, तर घराला कुलूप घालण्यापर्यंत दबावतंत्र वापरले जाते.
खासगी फायनान्स : ग्रामीण भाागात वलय
शिराळा तालुक्यात अनेक खासगी फायनान्स कंपन्यांनी तसेच सहकारी संस्थांनी आपले बचत गट तयार केले आहेत. हे बचत गट करत असताना, खासगी कंपनीवाले जवळपास प्रत्येक गावात जाऊन सुरुवातीला आपले वलय निर्माण करतात व गावातील पुढाकार घेणाऱ्या महिलांना हाताशी धरून ज्या महिलांना आर्थिक गरज आहे, अशा पाच-दहा-पंधरा महिलांचा बचत गट तयार करून त्यांना एक आठवड्यानंतर ५ ते ५० हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वेळेत परत न केल्यासा या कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी विविध फंडे वापरले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मानहानीचेही प्रसंग उद्भवत आहेत. यामुळे परिसरातील महिलांबरोबच अनेक नागरिकही तणावाखाली वावरत आहेत.
चौकशीची मागणी
एक छायाचित्र व रेशनकार्डच्या झेरॉक्सवर तातडीने कर्ज मिळत असल्यामुळे, अनेक रोजंदारी करणाऱ्या महिला, बचत गटांच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बचत गटांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.