सांगली : सांगली, मिरज शहर परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून विद्युत तारांचे व घरांचेही नुकसान झाले. शहरासह शिराळा, वाळवा, तासगाव परिसरातही पावसाने हजेरी लावली.
तौक्ते चक्रीवादळामुळे सांगली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात शनिवारी रात्रीपासून ढगांची दाटी झाली असून वादळी वारे सुरु आहेत. सांगली, मिरज परिसरात सकाळपासून ढगांची दाटी व वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. दिवसभर पावसाची हजेरी लागली. मध्यम स्वरुपाच्या पावसाने शहराच्या सखल भागात व गुंठेवारीत पाणी साचून राहिले. शहरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
राम मंदिर कॉर्नरजवळील प्रशांत कुलकर्णी यांच्या पार्किंग शेडवर झाडाची फांदी कोसळून नुकसान झाले. शहरात ड्रेनेजसाठी खोदाई केलेल्या भागांमधील रस्ते चिखलात रुतल्याने वाहतुकीसाठी बंद झाले. गुंठेवारी भागातही दलदल निर्माण झाली होती. शहरात छत्रपती शिवाजी स्टेडियम, स्टेशन चौक, शिवाजी मंडई, एसटी स्टँड रोड, सिव्हिल हॉस्पिटल चौक आदी ठिकाणी पाणी साचून राहिले.
चौकट
जिल्ह्यात चार दिवस पाऊस
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १८ मेपर्यंत जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडणार आहे. १९ व २० मे रोजी पावसाचा जोर कमी होणार आहे. काही भागातच तुरळक सरींची हजेरी लागणार आहे. त्यानंतर पाऊस थांबण्याची चिन्हे आहेत.