जतमध्ये पवनचक्क्या सील
By Admin | Updated: April 5, 2015 00:05 IST2015-04-05T00:05:02+5:302015-04-05T00:05:19+5:30
७७ लाखांचा दंड : विनापरवाना मुरुम उत्खनन; २६ वाहने जप्त

जतमध्ये पवनचक्क्या सील
जत : तालुक्यातील कोळगिरी व उमराणी परिसरात विनापरवाना वीस हजार ब्रास मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी घमेशा विंड व सुझलॉन या दोन पवनऊर्जा निर्माण कंपन्यांची ट्रॅक्टर, जेसीबी आदी सव्वीस वाहने जप्त करून त्यांना ७७ लाखाच्या दंडाची नोटीस शनिवारी बजावण्यात आली. त्यांच्या पवनचक्क्याही
सील करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पवनऊर्जा
कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
तालुक्यातील पवनऊर्जा निर्माण कंपन्या रस्ते व इतर कामांसाठी शासनाकडून घेतलेल्या परवान्यापेक्षा जादा मुरुम उत्खनन करून महसूल बुडवत आहेत. शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करून त्यांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करत आहेत.
यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी ही
कारवाई केली.
घमेशा विंड या पवनऊर्जा निर्माण कंपनीने कोळगिरी परिसरातील दीड किलोमीटर लांबीचा रस्ता केला आहे. त्यासाठी त्यांनी दोनशे ब्रास मुरुम उत्खनन करण्याचा परवाना घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात १९००० ब्रास मुरुम उत्खनन केले आहे. यासंदर्भात त्यांना ६४ लाख ६० हजार २५० रुपये दंडाची नोटीस देऊन त्यांची चौदा वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर पवनऊर्जा युनिट सील करण्यात आले आहे.
सुझलॉन कंपनीने उमराणी (ता. जत) परिसरात ३७० ब्रास विनापरवाना मुरुम उत्खनन केले आहे. त्यांना १२ लाख ५८ हजार २५० रुपये दंडाची नोटीस देण्यास आली आहे. त्यांची विविध प्रकारची बारा वाहने जप्त करण्यात आली आहेत.
रिनिव्हल टर्बाईन या पवनऊर्जा निर्माण कंपनीने निगडी खुर्द (ता. जत) परिसरात ३३ युनिट उभे केले आहेत. त्यासाठी त्यांनी एन ए परवाना घेतला नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. प्रकाश कन्स्ट्रक्शनने जत ते देवनाळ रस्त्यावर काँक्रिट मिक्सिंग प्लँट उभा केला आहे. त्यासाठी वाळू, खडी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे, परंतु त्याचा परवाना घेण्यात आला नाही. व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू असल्याने प्लँट सील करून ३ लाख ७४ हजार ८७५ रुपये दंडाची नोटीस देण्यात आली आहे. (वार्ताहर)