वैभव शिंदे यांची घरवापसी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:26+5:302021-04-27T04:28:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र आष्टा येथील युवक नेते वैभव शिंदे यांची राष्ट्रवादीचे ...

Will Vaibhav Shinde return home? | वैभव शिंदे यांची घरवापसी होणार?

वैभव शिंदे यांची घरवापसी होणार?

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र आष्टा येथील युवक नेते वैभव शिंदे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी वैभव शिंदे यांची भेट घेतल्याने आष्टा शहरात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. लवकरच वैभव शिंदे यांची घरवापसी होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू झाले. माजी आमदार विलासराव शिंदे यांची आष्टा शहर विकास आघाडी व मंत्री जयंत पाटील यांचा गट आष्टा पालिकेत सत्तेत आहे. सध्या वैभव शिंदे आष्टा शहर विकास आघाडीचे नेते आहेत.

वैभव शिंदे भाजपमध्ये असले तरी भाजपच्या अनेक कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. वैभव शिंदे आष्टा पालिकेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित असतात. विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होते. काही दिवसांपूर्वी वैभव शिंदे यांचा आष्टा येथे वाढदिवस झाला. तेव्हा मंत्री जयंत पाटील आष्टा येथे असूनही त्यांची भेट झाली नव्हती; मात्र सांगली येथे जयंत पाटील आले असता, त्यांनी आवर्जून वैभव शिंदे यांच्या घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राहुल पवार, शेखर माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री जयंत पाटील व वैभव शिंदे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेमुळे वैभव शिंदे पुन्हा राष्ट्रवादीत परत जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

फोटो : २६ आष्टा १

ओळ : सांगलीत युवा नेते वैभव शिंदे यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वरदराज शिंदे उपस्थित हाेते.

Web Title: Will Vaibhav Shinde return home?