इस्लामपुरात राष्ट्रवादीला धक्का देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:04+5:302021-04-05T04:23:04+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीविरोधात हेलकावे खात असलेले सत्ताधारी विकास आघाडीची मोट ...

इस्लामपुरात राष्ट्रवादीला धक्का देणार
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीविरोधात हेलकावे खात असलेले सत्ताधारी विकास आघाडीची मोट पुन्हा नेटाने बांधण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकी अगोदरच्या काही दिवसांतच राष्ट्रवादीतील तीन राजकीय वजनदार पाटील विकास आघाडीच्या गळाला लागणार असल्याचा गौप्यस्फोट गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला.
गत पालिका निवडणुकीत ३१ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या सत्ताधारी विकास आघाडीतच अंतर्गत संघर्ष आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत पालिकेच्या राजकारणात विकास आघाडीची मोट हेलकावे खात आहे. अशीच अवस्था विरोधी राष्ट्रवादीची आहे. त्यामुळेच शहराच्या विकासाचे तीन तेरा वाजले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीला पालिकेच्या राजकारणात ऊर्जा आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी आतापासूनच इच्छुक कार्यकर्त्यांतून घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे.
सत्ताधारी विकास आघाडीत स्वयंभू नेत्यांचे पेवच फुटले आहे, तर विरोधी राष्ट्रवादीमध्ये शहरात खमके नेतृत्व नाही. त्यामुळे शहराचा विकास ‘जैसे थे’ आहे. याचाच सारासार विचार करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रस्ते, गटारी याच्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु श्रेयवादामुळेच पालिकेच्या सभागृहात दोन्ही गटांकडून विकासापेक्षा अकलेचे तारे तोडण्यातच सभा गाजू लागल्या आहेत.
एकीकडे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या ताकतीवर राष्ट्रवादीची एक्स्प्रेस फुल्ल होऊ लागली आहे. त्यामुळेच आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी तयारी सुरू आहे. याचाच फायदा विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील उठविण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीमधील नाराज गटाला विकास आघाडीत उमेदवारी देण्याचे आमिष दाखवून खूणवत आहेत.
चौकट
उरुण परिसरात पाटील समाजातील भावकीमध्ये मोठी स्पर्धा आहे. प्रभाग कमी, उमेदवार जास्त अशीच परिस्थिती या परिसराची असते. म्हणूनच या परिसरातील काही नेते इस्लामपूर शहरातील प्रभागात उभे राहतात. येणाऱ्या निवडणुकीत सिंगल प्रभाग आहेत. पाटील भावकीत तिसऱ्या फळीतील उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोलांट्या उड्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढणार आहे.