कासेगावच्या विकासासाठी विरोधक एकत्र येणार का?
By Admin | Updated: May 26, 2015 00:53 IST2015-05-25T23:07:59+5:302015-05-26T00:53:34+5:30
सत्ताधाऱ्यांवर अंकुश नाही : गटा-तटाच्या राजकारणामुळे विरोधकांवर मर्यादा, कार्यकर्तेही सैरभैर

कासेगावच्या विकासासाठी विरोधक एकत्र येणार का?
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील विखुरलेले विरोधी गटातील नेते अॅड. बी. डी. पाटील, बापूसाहेब शिंदे, नेताजी पाटील वेगवेगळ्या पक्षात कार्य करीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी गट निर्धास्त असून, त्यांना भक्कम असा विरोधकच उरलेला नाही. त्यामुळे गावच्या विकासासाठी हे तिन्ही गट एकत्रित येणार का, अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.
कासेगाव हे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावावर त्यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. असे असले तरी गावात विरोधी वातावरणही जोरात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गावातून विरोधात लक्षणीय मतदान झाले आहे. याबद्दल जयंत पाटील यांनी खासगीत नाराजीही व्यक्त केली होती. गावात विरोधी गट प्रबळ असला, तरी तो गटा-तटातील राजकारणात अडकल्याने त्यांच्यावर मर्यादा पडल्या आहेत.
गावातील पारंपरिक विरोधक म्हणून अॅड. बी. डी. पाटील यांना ओळखले जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून त्यांनी राजकारणातून अलिप्त धोरण अवलंबले आहे. त्यांचा मुक्काम इस्लामपूरमध्येच जास्त असतो. अपवादानेच ते राजकीय व्यासपीठावर दिसून येतात. त्यांचे पुतणे व माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव पाटील यांच्याकडेच त्यांच्या गटाचे नेतृत्व आहे.
दुसरीकडे यशवंत ग्लुकोजचे उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे हेही अपवाद सोडला, तर सत्ताधाऱ्यांविरोधात काम करत आले आहेत. त्यांच्या पाठीमागे आमदार शिवाजीराव नाईक समर्थकांची मोठी फौज आहे. युवा नेते नेताजी पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. धडाडीचे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या मागे युवकांची मोठी फळी कार्यरत आहे.
एकंदरीत या तिन्ही नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची ताकद आहे. मात्र ती गटा-तटात विखुरल्याने म्हणावी तशी सक्रीय दिसून येत नाही. याचा फायदा सत्ताधारी गटाने घेतला आहे. त्यांना जाब विचारणारी सक्षम विरोधकांची फळी नसल्याने ते निर्धास्त आहेत.
परिणामी गावात सर्व काही आलबेल सुरू आहे. त्यामुळे हे तिन्ही नेते आपापसातील मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र य्ंोणार का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)
देवराज पाटील पुन्हा सक्रिय...
कासेगाव हे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावावर त्यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. त्यांचे पुतणे देवराज पाटील यांच्याकडे गावातील सारी सूत्रे आहेत. असे असले तरी गावात विरोधी वातावरणही जोरात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गावातून विरोधात लक्षणीय मतदान झाले आहे. याबद्दल जयंत पाटील यांनी खासगीत नाराजीही व्यक्त केली होती. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या जबाबदारीत व्यस्त असलेल्या देवराज पाटील यांनी गावात पुन्हा लक्ष घातले आहे. गावात विरोधी गट प्रबळ असला, तरी तो गटा-तटातील राजकारणात अडकल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत.