राष्ट्रवादीचे पारडे भाजप फिरविणार का?
By Admin | Updated: October 5, 2015 23:37 IST2015-10-05T23:37:19+5:302015-10-05T23:37:19+5:30
काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष : २६ ग्रामपंचायती आबा गटाच्या, तर ११ काका गटाच्या ताब्यात--तासगावचा रणसंग्राम

राष्ट्रवादीचे पारडे भाजप फिरविणार का?
दत्ता पाटील -- तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये दुरंगी लढतीचे चित्र आहे. सद्यस्थितीत निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीपैकी आबा गटाचे २६, तर काका गटाचे ११ ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. राष्ट्रवादीची मदार कार्यकर्त्यांवरच, तर भाजपकडून खासदार संजयकाका पाटील स्वत: सक्रिय आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत जड असलेले राष्ट्रवादीचे पारडे भाजपकडे फिरणार, की राष्ट्रवादीचा गड अभेद्य राहणार, याकडे लक्ष आहे. दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेकडेही लक्ष आहे.
तासगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे किंबहुना माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. त्यामुळे तासगाव तालुका म्हणजे आबांचा बालेकिल्ला, अशीच आतापर्यंची ओळख होती. मात्र तालुक्यात सहा महिन्यांपासून होत असलेली राजकीय स्थित्यंतरे आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या राजकीय रणनीतीमुळे तालुक्यात होत असलेल्या ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना विशेष महत्त्व आले आहे.
३९ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर आबा गटाचेच वर्चस्व आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघात समावेश असणाऱ्या १६ ग्रामपंचायतींचाही या निवडणुकीत समावेश आहे. काका गटाच्या ताब्यात असलेल्या ११ पैकी तब्बल सात ग्रामपंचायती याच मतदारसंघातील आहेत. या निवडणुका गावकी आणि भावकीच्या संबंधावर बेतलेल्या असल्यामुळे अटीतटीने होणार आहेत. संजयकाकांनी तासगाव नगरपालिका आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीत फोडाफोडी करुन भाजपची सत्ता आणली आहे. तालुक्यावर वर्चस्व ठेवण्याची संजयकाका पाटील यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे स्वत: खासदार मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील यांनीही कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात दोन ग्रामपंचायतींवर काँगे्रसचे वर्चस्व आहे. त्यापैकी विजयअण्णा पाटील यांनी बाजार समितीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीशी जवळीक केली आहे. त्यामुळे येळावी, जुळेवाडी ग्रामपंचायतीत नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. विसापूरचे सदस्य सुनील पाटील यांनी खासदार संजयकाकांच्या व्यासपीठावर हजेरी लावली आहे. त्यामुळे विसापूरमध्येही नवीन समीकरणे दिसणार आहेत. असे असले तरी यावेळची निवडणूक ही केवळ ग्रामपंचायतींपुरती मर्यादित न राहता, नेत्यांच्या वर्चस्वाची पायाभरणी ठरणारी असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामपंचायतीमधील पक्षीय बलाबल
आबा गटाचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायती विसापूर , शिरगाव (वि.), हातनोली, विजयनगर, मांजर्डे, हातनूर, गोटेवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, कवठेएकंद, सावळज, कौलगे, लोढे, डोर्ली, वज्रचौंडे, येळावी, राजापूर, तुरची, पाडळी, वाघापूर, वडगाव, दहीवडी, डोंगरसोनी, गव्हाण, सिध्देवाडी, यमगरवाडी,
काका गटाच्या ग्रामपंचायती आळते, निंबळक, बोरगाव, पेड, गौरगाव, मोराळे, धामणी, लोकरेवाडी, धुळगाव, ढवळी, जरंडी.
काँग्रेस पक्षाचा प्रभाव असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नागाव कवठे, जुळेवाडी