सांगलीचे कारागृह नव्या जागेत हलविणार
By Admin | Updated: August 9, 2015 00:46 IST2015-08-09T00:43:19+5:302015-08-09T00:46:09+5:30
मीरा बोरवणकर : जागेचा शोध सुरू

सांगलीचे कारागृह नव्या जागेत हलविणार
सांगली : सांगलीच्या कारागृहाची इमारत फार जुनी आहे. कारागृहाला लागून शाळा व टोलेजंग इमारती आहेत. शाळेचे छत व इमारतींवरून कारागृहातील सर्व चित्र दिसते. सुरक्षिततेच्यादृष्टीने हे धोक्याचे आहे. त्यामुळे कारागृहासाठी नवीन जागेचा शोध सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेतली आहे, अशी माहिती कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी सांगलीत शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मीरा बोरवणकर दोन दिवसांपासून सांगली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी स्वतंत्रपूर (ता. आटपाडी) येथील खुल्या कारागृहाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी सकाळी सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. अधीक्षक एम. एस. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते. बोरवणकर यांनी कारागृहाची पाहणी करून कैद्यांशी चर्चा केली. कारागृहात नेमक्या काय त्रुटी आहेत? त्यावर काय केले पाहिजे, याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बराच वेळ त्यांच्यात ही चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, सांगली, आटपाडी, कोल्हापूर व सातारा या कारागृहांना भेट देऊन पाहणी केली आहे. प्रशासन, कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. विशेषत: कैद्यांच्या राहण्याची स्थिती कशी आहे, याची माहिती घेतली आहे. आटपाडीच्या स्वतंत्रपूर कारागृहातील कैद्यांना दारिद्र्यरेषेखालील योजनेतून धान्य पुरविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तेथील कैद्यांसाठी राहण्याची व्यवस्थाही सुधारण्यात येईल. सांगलीसह अनेक कारागृहांना सुरक्षिततेच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कुंपन भिंतींची उंची कमी आहे, तर काही ठिकाणी कारागृहाच्या परिसरात नागरी वस्ती वाढली आहे. सांगलीत कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची २५ खोल्यांची वसाहत पडून आहे. ती कर्मचाऱ्यांसाठी घेणार आहे. (प्रतिनिधी)
राज्यातील कारागृहांत सुरक्षिततेबाबत त्रुटी
राज्यातील काही कारागृहांत सुरक्षिततेबाबत त्रुटी आहेत. तेथे संबंधित जिल्हा पोलीसप्रमुखांकडून लेखापरीक्षण करून घेण्यात आले आहे. लेखापरीक्षणातून कारागृहांत त्रुटी आढळून आल्या आहेत. आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करीत आहोत. अजूनही काही कारागृहांत लेखापरीक्षणाचे काम सुरू आहे.