‘कृष्णा’ची दिवाळी गोड होणार का?
By Admin | Updated: October 2, 2015 23:44 IST2015-10-02T23:44:08+5:302015-10-02T23:44:08+5:30
मोफत साखर, पण पाचशे कोटींचे कर्ज : हंगाम पार पाडण्यासाठी कसरत

‘कृष्णा’ची दिवाळी गोड होणार का?
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
एकीकडे साखर उद्योग संकटात आल्यामुळे येणाऱ्या हंगामात उसाला चांगला दर देणे शक्य नसल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत, तर दुसरीकडे कृष्णा कारखान्याने सभासदांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सभासदांना मोफत साखरेतून मिळालेली दिवाळी भेट गोड लागणार का, याचे उत्तर सध्यातरी गुलदस्त्यात आहे. कारण पाचशे कोटींचे कर्ज असणाऱ्या ‘कृष्णा’ला हंगाम पार पाडण्यासाठी दिव्य पार करावे लागणार आहे.
कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तासंघर्षात सहकार, रयत व संस्थापक पॅनेलच्या नेत्यांनी सभासदांवर आश्वासनांची खैरात केली होती.
सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी सभासदांना मोफत साखर देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांचे पॅनेल सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वार्षिक सभेत मोफत साखर देण्याचा ठराव करण्यात आला. याचवेळी कारखान्यावर पाचशे कोटी रुपयांचे कर्ज आहे, कारखाना चालविताना अनेक अडचणी येत आहेत, ही दूसरी बाजूही त्यांनी सभासदांसमोर मांडली होती.
माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कामगार भरती केल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. अशा अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात आले आहे. त्यातूनही विद्यमान संचालकांच्या मर्जीतील कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे. मात्र कामगारांच्या पगारापोटी होणाऱ्या खर्चातही मोठी कपात करून, येणारा हंगाम कमीत कमी कर्मचाऱ्यांवर पूर्ण केला जाणार आहे.
या हंगामात ऊस उत्पादकांच्या पदरात चांगला ऊस दर पडणार, की मोफत साखरेवरच गोड मानून घ्यावे लागणार, हे आता येणारा काळच ठरवणार आहे. तोपर्यंत मात्र वाट पाहावी लागणार.