आर. आर. आबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:25 PM2018-11-16T19:25:15+5:302018-11-16T19:25:51+5:30

माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे परिस होते. कोणत्याही खात्याचे मंत्री असू दे, त्यांनी संधीचे सोने केले.

will give R. R. patil stachu funds - Sudhir Mungantiwar | आर. आर. आबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही- सुधीर मुनगंटीवार

आर. आर. आबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही- सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

सांगली : माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे परिस होते. कोणत्याही खात्याचे मंत्री असू दे, त्यांनी संधीचे सोने केले. ते स्वतःसाठी नव्हे तर सामान्य माणसासाठी जगायचे. राजकीय क्षेत्रात हृदयातून काम करणाऱ्या दुर्मीळ नेत्यांपैकी ते एक होते. त्यामुळेच त्यांचे स्मारक पक्षीय भिंतींबाहेर जाऊन, सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करण्याची प्रेरणा देत राहील. या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे दिली.

सन 2016-17 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महात्मा गांधी वसतिगृहाजवळ होत असलेल्या या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुमन पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

1995 साली आपण प्रथम विधिमंडळ कारकिर्दीस प्रारंभ केला, त्यावेळी कारकिर्दीच्या प्रारंभी दिवंगत आर. आर. पाटील यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्षरीत्या आपल्या मार्गदर्शकाची भूमिका बजावली, असे नमूद करून वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, आर आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतल्यामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळाली. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून, त्यांनी लोकशाही म्हणजे राजकीय पद्धती नव्हे तर जीवन जगण्याची, जीवन जगण्यासाठी मदत करण्याची पद्धती आहे, अशी व्याख्या केली. 
ते म्हणाले, आर. आर. पाटील यांचे स्मारक हे केवळ दगड, विटांची इमारत न होता, हे स्मारक कलियुगात जन्म घेतलेल्या एका दुर्मीळ प्रजातीच्या राजकीय नेत्याच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. एखादी व्यक्ती राजकारणात येईल, तेव्हा त्याच्यासाठी आदर्शाचा वस्तुपाठ या स्मारकाच्या माध्यमातून मिळेल. कामाचा केंद्रबिंदू कोण असेल, कुणासाठी राजकारण करायचे हे समजून घ्यायची शक्ती त्याला या स्मारकातून मिळेल. प्रतिकूल परिस्थितीतही कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रेरणा हे स्मारक अनेकांना देईल. या स्मारकासाठी निधी कमी पडणार नाही. तर निधी वेळेवर उपलब्ध होईल आणि विहित वेळेत स्मारकाचे कामही पूर्ण होईल.

वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, आज आर. आर. पाटील हयात असते तर त्यांची एकसष्ठी यापेक्षा वीसपट मोठ्या मैदानावर साजरी झाली असती. आर. आर. पाटील यांचे भाषण ओठातून, मेंदूतून नव्हे तर हृदयातून व्हायचे आणि श्रोतेही ते मनापासून ऐकायचे. एक लक्ष्य ठेवून, एक बांधिलकी ठेवून त्यांचे भाषण असायचे. ते म्हणाले, आर. आर. पाटील स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच क्रांतीसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालय, पांडु मास्तर स्मारक आणि हिंदकेसरी मारूती माने स्मारक यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. चित्रकुट बंगला सोडल्यानंतर आपल्या मुलीने बंगल्यावर जाण्याचा केलेला हट्ट आर. आर. पाटील यांनी पूर्ण केला. तसेच, भारनियमनाच्या काळात स्वतःच्या कार्यालयातील वातानुकुलन यंत्र (ए. सी.) बंद ठेवले. आपल्या मैत्रीखातर गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतले. 
डान्सबारबंदी यासह अन्य आठवणींतून यावेळी त्यांनी आर. आर. पाटील यांच्याशी असलेल्या पक्षापलिकडच्या व्यक्तिगत मैत्रीच्या स्मृतींना उजाळा दिला.  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आर. आर. पाटील यांच्यावर सामान्य जनतेचे प्रेम होते. गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारताना त्यांनी दुर्गम भागात वाहतुकीची सोय केली. त्यांच्यामुळे गडचिरोलीतील तरुण नक्षली चळवळीत जाण्यापासून परावृत्त झाले. तेथील जनतेसाठी त्यांनी महाराष्ट्र दर्शनाचीही सोय केली. त्याच बरोबर त्यांनी जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त अधिकार देत खऱ्या अर्थाने सक्षम केले. 

खासदार संजय पाटील म्हणाले, आर. आर. पाटील यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. स्वकर्तृत्वाने त्यांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली. केंद्र आणि राज्य शासनाने दुष्काळी भागातील उपसा सिंचन योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या या योजनांचे पूर्णत्व हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 
आमदार सुमन पाटील म्हणाल्या, लोकनेता म्हणून आर. आर. पाटील यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. तेथील दुर्गम भागापर्यंत विकासात्मक काम पोहोचवले. स्वच्छता, तंटामुक्त अभियानातून लोकांचे मन स्वच्छ करण्याचे काम केले. या स्मारकासाठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि शासनाने निधी दिला, याबद्दल ऋण निर्देश व्यक्त करून हे स्मारक प्रेरणादायी ठरेल.

माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार म्हणाले, आर. आर. पाटील यांचे व्यक्तिमत्व जनतेच्या मनात आदराचे स्थान असलेले होते. स्वच्छ चारित्र्याचा हा नेता जनतेला आपल्या घरातीलच वाटत असे. त्यांची जन्म, कर्म आणि मर्मभूमी असलेल्या या सांगली जिल्ह्यात होणारे हे स्मारक शहर आणि जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे आहे. या स्मारकातून त्यांचा इतिहास आणि आठवणींना उजाळा मिळेल. आर. आर. पाटील यांची बांधिलकी सर्वसामान्य आणि बहुजनांशी होती. म्हणूनच त्यांचे निर्णय सामान्यांच्या हिताचे होते.
दिवंगत आर. आर. पाटील यांच्या अनेक आठवणी जागवत आमदार अनिल बाबर म्हणाले, आर. आर. पाटील सामान्य माणसाचा कळवळा असलेले नेते होते. दुष्काळी भागाला न्याय देण्याची त्यांची भूमिका कायम ठेवली. त्यांची कामगिरी अष्टपैलू होती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत आर आर पाटील यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर आपल्या कष्टातून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदावर असताना त्यांनी आपली प्रतिमा उजळ केली. तासगाव मतदार संघावर स्वतःच्या कर्तृत्वाने प्रभाव निर्माण केला. त्यामुळे तासगाव तालुक्यातील जनतेने त्यांना खूप प्रेम दिले. सत्तेत असताना आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांनी वक्तृत्व आणि शब्दप्रतिभेने विधानसभेत स्वतःचे स्थान निर्माण केले. मंत्री असताना त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय समाज मनावर प्रभाव निर्माण केला. तळागाळात काय सुधारणा कराव्या लागतील, हे त्यांना माहीत होते. त्यांच्या विचाराने काम करण्याची मानसिकता ठेवली तर हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
हे स्मारक जिल्ह्याला भूषण ठरेल, असे सांगून आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि दिवंगत आर. आर. पाटील जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न मांडले. त्यांच्या या कर्तृत्त्वाची पोहोच त्यांना राज्यस्तरावर काम करण्याच्या संधीतून मिळाली. तिथेही चमकदार कामगिरी करत त्यांनी विधिमंडळाचे, राज्याचे लक्ष वेधून घेतले. या स्मारकाच्या माध्यमातून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या स्मृती जपल्या जातील.     
आमदार विलासराव जगताप यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. 
यावेळी सर्वच नेत्यांनी पक्षीय पातळी पलिकडे जावून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी स्मारकाची प्रशासकीय माहिती सांगितली. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी आभार मानले. वैभव माने या विद्यार्थाने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.

Web Title: will give R. R. patil stachu funds - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.