शिवसेना संस्थांच्या निवडणुका लढविणार
By Admin | Updated: November 21, 2014 00:38 IST2014-11-20T22:45:57+5:302014-11-21T00:38:11+5:30
नितीन बानुगडे-पाटील : नुसत्या बोर्डावरच्या शाखा नकोत

शिवसेना संस्थांच्या निवडणुका लढविणार
सांगली : आजवर शिवसेना लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहे. यापुढे संघर्षाबरोबरच लोकांचे प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने सहकारी संस्था ताब्यात घेण्याचाही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आगामी काळात ग्रामीण भागातील छोट्या संस्थांपासून जिल्हास्तरावरील स्थानिक स्वराज संस्था, बॅँका अशा प्रत्येक संस्थेच्या निवडणुका शिवसेना लढविणार आहे, अशी माहिती सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, सहकारी संस्थांचा ताबा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहे. अशा सर्व संस्थांचा ताबा लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका लढवून आम्ही घेऊ. त्याची तयारी आम्ही केलेली आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अशा संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व असणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत शिवसेना लोकहितासाठी आंदोलन करणारी संघटना म्हणून परिचित होती.
यापुढे लोकांचे प्रश्न सोडविणारी संघटना म्हणून नवीन ओळख आम्ही करून देऊ. लोकहिताच्या प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरू राहील. भाजपने शब्द मोडला तरी, शिवसेना कोणताही शब्द मोडणार नाही. शिवसेना राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. स्थानिक पातळीवरही ही भूमिका आम्ही चोखपणे बजावू. गाव तिथे शाखा निर्माण केल्या जातील. केवळ बोर्डावरचे अस्तित्व दाखविणाऱ्या शाखा अपेक्षित
नाहीत. दोन जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. संघटन अधिक मजबूत आणि व्यापक बनविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. ऊसदर, दुष्काळाचे प्रश्न, अवकाळी पावसाने झालेले नुकसान अशा सर्व गोष्टींवर आम्ही परखडपणे भूमिका मांडून हे प्रश्न तडीस नेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पृथ्वीराज पवार, गौतम पवार, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, विकास सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)