गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2015 23:30 IST2015-08-04T23:30:57+5:302015-08-04T23:30:57+5:30

पतंगराव कदम : कवठेमहांकाळ येथील प्रचार सभेत सवाल; भाजप नेत्यांवर टीका

Will the bully choose them? | गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?

गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?

कवठेमहांकाळ : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत गुन्हेगारांनी कहर केला आहे. ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. मग अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण पोसायचे का? त्यांना आपण संधी द्यायची का?, असा सवाल आ. पतंगराव कदम यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान, अशा प्रवृत्तींना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कवठेमहांकाळ येथे मंगळवारी शेतकरी दूध संघाच्या सभागृहात वसंतदादा रयत पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व मतदारांची सभा पार पडली. यावेळी कदम बोलत होते.कदम म्हणाले की, माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात मी संस्था वाढविण्याचे व सुदृढ ठेवण्याचे काम केले. संस्था काढायच्या व मोडायच्या हा उद्योग कधीच केला नाही. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत मिरज, कवठेमहांकाळ, जतच्या लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा वचक होता. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सांगली चिल्लर’ झाली आहे. वसंतदादांच्या पश्चात सांगलीचा दबदबा राहिला नाही. हा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी जनतेने आपल्याला ताकद व आशीर्वाद द्यावेत.सांगलीच्या राजकारणात ‘सत्तापिपासू’ टोळ्या निर्माण झाल्या आहेत. टोळ्या करून सत्ता भोगायची अन् स्वार्थ साधायचा, असे उद्योग या टोळ्यांनी आजवर जिल्ह्यात केले आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा टोळ्या मतदारांनी राजकारणातून हद्दपार कराव्यात. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारणाला गुंडगिरीचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे अशा लोकांना संधी द्यायची का, याबाबतचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे ते म्हणाले.
अजितराव घोरपडे म्हणाले, शेती व शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून मतदारांनी काठावर विजयी करू नये, तर भरघोस मतांनी विजयी करावे. बाजार समितीचा निकाल भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारा असेल. शेतकऱ्यांसाठी भविष्यात बरेच काही करायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने मतदारांनी कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेत माजी आमदार दिनकर पाटील, आप्पासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांचीही भाषणे झाली. सभेस आनंदराव मोहिते, राजवर्धन घोरपडे, बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, उदयसिंह शिंदे, सुनील माळी, तानाजी यमगर उपस्थित होते. (वार्ताहर)


उपायुक्तांची नियुक्ती
औषध गोदामामधील घोटाळ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे उपायुक्त एस. बी. कोळी आणि सांगली जिल्ह्याचे प्रभारी उपायुक्त बी. ए. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर डॉ. विश्वासराव मोरे आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी होणार
पशुसंवर्धन विभागाकडे तीन लाखांची औषधाची मागणी केली होती. प्रत्यक्षात औषधाचा पुरवठा न होताच सर्व तालुक्यांकडून पोच घेऊन संबंधित कंपनीला तीन लाखांचा धनादेश दिला होता. प्रत्यक्षात दोन वर्षात औषधेच मिळाली नाहीत. या घोटाळ्याबद्दल जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर मे २०१५ रोजी रोखीने तीन लाख रुपये भरल्याचे चलन फाईलला लावल्याचे आढळून आले आहे. या औषध खरेदीचा सर्व गोंधळ पाहिल्यास हा घोटाळाच असल्याने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोषींवर फौजदारी कारवाईसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. येत्या आठ दिवसांत औषध खरेदी घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: Will the bully choose them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.