विद्युत डीपीखाली उलटे टांगून घेऊन आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:30+5:302021-06-10T04:19:30+5:30
टेंभू याेजनेचे पाणी व वीजबिलप्रश्नी डी. एस. देशमुख यांनी कडेगाव येथे चार दिवसांचे मौन व आत्मक्लेश आंदोलन ...

विद्युत डीपीखाली उलटे टांगून घेऊन आंदोलन करणार
टेंभू याेजनेचे पाणी व वीजबिलप्रश्नी डी. एस. देशमुख यांनी कडेगाव येथे चार दिवसांचे मौन व आत्मक्लेश आंदोलन केले. हे आंदोलन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पाणी व ज्यूस घेऊन सोडले. मात्र आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, गेली अनेक वर्षे पाणी व वीजप्रश्नाबाबत आंदोलन करूनसुद्धा टेंभू व महावितरण प्रशासनाने हा प्रश्न योग्य प्रकारे सोडविला नाही. कडेगाव ते कडेपूर कालवा पाईपलाईन टाकून बंदिस्त करावा. या कालव्याची हद्द निश्चित करून अतिक्रमण काढावे. सुर्ली ११ नंबर कालव्यावरील अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्याची डागडुजी करावी. तसेच या कालव्याचे उर्वरित कामही पूर्ण करावे. कडेगाव व गायकवाड तलावावर वाढलेली झाडे तोडावीत. शेतीपंप विभागातील तारा तुटून अनेक ठिकाणी खाली पडल्या आहेत. त्यामुळे मनुष्य, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका आहे. चुकीच्या पद्धतीने आकारलेली वीज बिले दुरुस्त करावीत, यांसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या प्रश्नी चार दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन केले, तरीदेखील याची दखल घेतली गेली नाही. यामुळे आंदोलनाची दिशा बदलत विद्युत डीपीखाली स्वत:ला उलटे टांगून घेऊन आंदोलन करणार आहे.
फोटो : ०९ कडेगाव २
कडेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मौन व आत्मक्लेश आंदोलन सोडले.