बोरगावजवळ अपघातात पती ठार, पत्नी गंभीर
By Admin | Updated: February 24, 2016 00:43 IST2016-02-24T00:43:00+5:302016-02-24T00:43:00+5:30
टेम्पोची दुचाकीस धडक : दाम्पत्य कवठेमहांकाळचे; जमावाकडून टेम्पोची तोडफोड

बोरगावजवळ अपघातात पती ठार, पत्नी गंभीर
कवठेमहांकाळ/देशिंग/शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण-बोरगाव येथील नंदिवाले वस्तीजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दादासाहेब जयवंत भोसले (वय ५०, रा. आश्रमशाळेजवळ, कवठेमहांकाळ) जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी वंदना (४५) गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.
दादासाहेब भोसले व पत्नी वंदना यांच्यासह सकाळी कवठेमहांकाळ येथून शिरढोण-बोरगाव रस्त्यावरून देवदर्शनासाठी पद्माळेकडे (ता. मिरज) निघाले होते. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील फाट्यावरून ते बोरगावच्या दिशेने काही अंतर पुढे आले असता, शिरढोणच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या टेम्पोने (क्र. केए ४९ : ३६७०) समोरील ट्रकच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात, समोरून येणाऱ्या भोसले यांच्या दुचाकीस (क्र. जेएच ०१ बीजी ०६७५) जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे रक्तस्राव होऊन भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी वंदना गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका जोरात होता की, भोसले यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोचालकाने पलायन केले. अपघातानंतर जवळच शेतात मजुरी करीत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी टेम्पोची तोडफोड केली. हा टेम्पो द्राक्ष वाहतूक करीत असल्याचे समजते. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून, एल. एम जाधव अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)