कोकरुड: सावंतवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवल्याची घटना गुरुवारी घडली. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रविवारी मृत्यू झाला. तिच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पती संजय बयाजी बेंगडे (वय ५३) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अनिता संजय बेंगडे (वय ४०) यांच्या मृत्यूपूर्व जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.सावंतवाडी येथे अनिता पती व कुटुंबासोबत राहात होती. अनिताला एक मुलगा आहे. पती संजय याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे संजय वेळोवळी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वारंवार मारहाण करत असे. गुरुवार, ११ तारखेला रात्री अनिता घरात स्वयंपाक करत असताना, संजयने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मारहाण, शिवीगाळ करत रागाच्या भरात चूल पेटविण्यासाठी आणलेले डिझेल तिच्या अंगावर ओतून काडी ओढून पेटवले. या घटनेत अनिताला ७० टक्के भाजली. तिला प्रथम कराड आणि नंतर सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. रविवारी पहाटे रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यु झाला. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी अरुण पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अतिग्रे करत आहेत.
Sangli: सावंतवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस पेटवले, संशयित पती गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:08 IST