जयंतरावांनी दर का दिला नाही?
By Admin | Updated: March 31, 2015 00:27 IST2015-03-30T23:18:52+5:302015-03-31T00:27:08+5:30
राजू शेट्टी : स्वत:ला ‘शेतकऱ्यांचे तारणहार’ समजणारे दर देण्यात मागे का?

जयंतरावांनी दर का दिला नाही?
इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५00 ते २६00 रुपये पहिली उचल दिली आहे. शिराळ्याच्या डोंगरी भागात असलेल्या निनाईदेवी कारखान्याचे चालक दालमिया यांनीही २५00 रुपये दर दिला आहे, तर शेतकऱ्यांचे तारणहार असणारे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मात्र २0५0 रुपये पहिली उचल दिली, तीही दोन हप्त्यात! तीन हजार रुपये देऊ, असे म्हणणारे जयंत पाटील आता का दर देऊ शकत नाहीत? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज (सोमवारी) उपस्थित केला.जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यामध्ये खा. शेट्टी यांच्यावर सडकून टीका सुरू केली आहे. त्या टीकेने अस्वस्थ झालेल्या खा. शेट्टी यांनी आज ‘लोकमत’शी संपर्क साधून जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उसामध्ये असा काय फरक आहे, म्हणून दोन्ही जिल्ह्यातील उसाच्या दरामध्ये तब्बल ५00 रुपयांची तफावत केली जात आहे? विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड पैसा खर्च केला आहे, त्याची वसुली ऊस उत्पादकांकडून केली जात आहे का? की, बारामती येथे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी मेजवानी दिली, त्याच्या वर्गणीची वसुली केली जात आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.शेट्टी म्हणाले की, जयंत पाटील उसाचा दर देण्यात मागे पडले आहेत. एक तर त्यांचा कारखाना प्रचंड कर्जबाजारी झाला असावा, नाही तर व्याजाचा आर्थिक बोजा पडला असावा. त्यामुळेच त्यांच्या कारखान्याने एफआरपीनुसार निर्धारित केलेला दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर देण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांच्या कारखान्याने कमी दर देऊन विधानसभा निवडणुकीत झालेला, तसेच पंतप्रधानांच्या बारामतीमधील मेजवानीचा खर्च काढल्यामुळे, त्यांच्या दराचा मेळ बसत नसावा. जयंत पाटील यांनी कमी दर का दिला याचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
जयंत पाटील यांची सडकून टीका
माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांचा सध्या मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे. मेळाव्यात शेट्टी यांच्या भूमिकेबाबत जयंत पाटील सडकून टीका करीत आहेत. खासदार म्हणून राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले? आज साखर उद्योग अडचणीत असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते मंत्रीपदाची वाट पाहात आहेत. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना केंद्राकडून साखर अनुदानासाठी प्रयत्न करता आले असते, पण अद्याप मंत्रीपदाची आशा असल्याने ते केवळ आंदोलनाची भाषा करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप जयंत पाटील सातत्याने करीत आहेत.