पुरोगामी विचारांची धास्ती का वाटते?
By Admin | Updated: February 25, 2015 00:02 IST2015-02-24T23:21:04+5:302015-02-25T00:02:40+5:30
राजन गवस यांचा सवाल : वाळव्यात अरुण नायकवडी स्मृतिदिन कार्यक्रम

पुरोगामी विचारांची धास्ती का वाटते?
वाळवा : सध्या राज्यात काय चालले आहे व चालणार आहे हे समजू शकत नाही. कुणाच्या दारात केव्हा मारेकरी येतील हेसुध्दा सांगता येत नाही. येथील पुरोगामी विचारांची कुणाला आणि कशासाठी धास्ती वाटते?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस यांनी केला.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर आज (मंगळवार) अरुण नायकवडी यांचा दहावा स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष जयवंत अहिर, कारखाना उपाध्यक्षा सौ. वंदना माने, नीलावती माळी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, महेश कराडकर, डॉ. शीतल भरमगुडे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले उपस्थित होते.प्रा. गवस म्हणाले की, आज जीवनमूल्यांचा ऱ्हास झाला आहे. मात्र गरजांचा हैदोस वाढला आहे. केव्हा तरी उपयोगी पडणाऱ्या व उपद्रवी ठरणाऱ्यालाच सध्या सलाम केला जात आहे. त्यामुळे आदर्श धाकच संपला आहे. शेतकऱ्यांना जगविण्यासाठी माध्यम म्हणून वृत्तपत्रांनी आता यापुढे जबाबदारी घेऊन लेखन करावे.
वैभव नायकवडी म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनंतर कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना शासनाने शोधावे. त्यांचे विचार दाबण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांनाही उघडे करा, त्यांना कठोर शासन करा. पुरोगामी विचारवंतांना देह संपला तरी त्याचे विचार मात्र संपणार नाहीत, हे जातीयवादी प्रवृतींनी लक्षात घ्यावे. यावेळी अनुभूती अरुण नायकवडी म्हणाल्या की, क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी ही शिल्पातून निर्माण झालेली माणसे होत. अरुण हे स्वत:ला कामात झोकून देणारे व्यक्तिमत्त्व होते. आज ते असते, तर ‘हुतात्मा’च्या रथाची चाके आणखी वेगाने धावली असती.
प्रारंभी अरुण नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजा माळगी, प्रा. के. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच गौरव नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, नजीर वलांडकर, हुतात्मा दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक, पोपट अहिर, संजय अहिर, अशोक माने, संजय खोत, नंदू पाटील, उपसरपंच सौ. अपर्णा साळुंखे हुतात्मा संकुलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
विचारांची लढाई विचारांनीच करावी
यावेळी राजन गवस म्हणाले की, देशाला पुरोगामीत्वाचा विचार देणाऱ्या महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्या होत आहेत, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. प्रथम दाभोलकर, आता पानसरे यांची हत्या करणारे अजूनही मोकाटच आहेत. या विचारवंतांपासून कोणत्या प्रकारची भीती कोणाला होती हेच कळेनासे झाले आहे. एखाद्याला तुम्ही देहाने संपवाल, पण त्यांनी दिलेला विचार कधीही संपत नसतो. जगण्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हाती जाणे, हे अराजकतेचे लक्षण आहे. विचारांची लढाई शस्त्रांऐवजी विचारानेच करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.