होलसेल भाजीपाला विक्री फळ मार्केटला स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:18+5:302021-04-18T04:26:18+5:30
सांगली : सांगली शहरात होलसेल भाजी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी मंडईत भरणारा होलसेल भाजीपाला बाजार सोमवारपासून कोल्हापूर ...

होलसेल भाजीपाला विक्री फळ मार्केटला स्थलांतरित
सांगली : सांगली शहरात होलसेल भाजी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी मंडईत भरणारा होलसेल भाजीपाला बाजार सोमवारपासून कोल्हापूर रोडवरील फळ मार्केटला भरणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. भाजीसाठी शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
कापडणीस म्हणाले की, राज्य सरकारकडून संचारबंदीसह अनेक कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात अत्यावश्यक आस्थापना वगळता आणि शासनाने परवानगी दिलेले व्यवसाय वगळता अन्य आस्थापना आणि दुकाने बंद आहेत. मात्र, शहरात दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भरणाऱ्या होलसेल भाजीपाला मार्केटमुळे गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती आहे.
ही गर्दी टाळण्यासाठी होलसेल भाजी बाजारच शहराबाहेर विस्तीर्ण जागेत असलेल्या विष्णुअण्णा दुय्यम बाजार आवारात स्थलांतरित केला जाणार आहे. सोमवारपासून सांगलीतील होलसेल भाजीपाला बाजार फळ मार्केटमध्ये भरवला जाणार असून याची सर्व भाजी विक्रेते, होलसेल विक्रेते यांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे. सोमवारपासून जर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कोणी भाजी होलसेलरने विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.