प्रवाशांना क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:26+5:302021-04-25T04:27:26+5:30

सांगली : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सुरू असलेले निर्बंध आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात ...

Who will stamp the quarantine on the passengers? | प्रवाशांना क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण?

प्रवाशांना क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण?

सांगली : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सुरू असलेले निर्बंध आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या शासकीय विभागाने हे काम करायचे, याबाबत निश्चित आदेश नसल्याने प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण, हा सवाल कायम आहे.

दोन दिवसांपूर्वी अधिक कडक अंमलबजावणी करताना शासनाने जिल्हाबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आणि ई-पास असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, असे सांगितले हाेते. तसेच लक्षणे आढळून आल्यास त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार होते.

जिल्हाबंदी नियमांचे शुक्रवारपासून कडक पालन सुरू करण्यात आले आहे. मात्र, खासगी बसने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदणीची आणि त्यांना तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यन्वित नाही. याबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याने इतर यंत्रणांनी तपासणीस असमर्थता दर्शवली आहे.

इतर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आरोग्य, आरटीओ, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक कार्यन्वित करण्यात आले आहे. हे पथक ठरवून दिलेल्या थांब्यावर प्रवाशांची तपासणी करून नोंद घेत आहे तर लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.

जिल्हाबंदीची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही याबाबतचे आदेश दिले होते. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असली तरी जिल्ह्यात मात्र, या नियमाला बगल देण्यात आली आहे.

चौकट

आरटीओ, पोलीस, वाहतूकदार संघटना, शासकीय प्रतिनिधीचे पथक

शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात याबाबतचे काम सुरू आहे. आरटीओ, पोलीस, वाहतूकदार संघटना आणि शासकीय प्रतिनिधी असलेल्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून पाच ठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातही प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाईनची आवश्यकता असल्यास त्याची कार्यवाही महत्त्वाची बनली आहे.

Web Title: Who will stamp the quarantine on the passengers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.