वाळवा तालुक्यात युवक काँग्रेसला धनी कोण?
By Admin | Updated: June 16, 2016 01:10 IST2016-06-15T23:22:35+5:302016-06-16T01:10:10+5:30
अध्यक्ष पदावर दोघांचा दावा : अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; खमक्या नेत्यांची मागणी

वाळवा तालुक्यात युवक काँग्रेसला धनी कोण?
अशोक पाटील - इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील काँग्रेसला खमक्या धनी नसल्याने युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदावर विजय पवार आणि राजू वलांडकर या दोघांनीही दावा केला आहे. दोघेही आपणच अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत.
शिराळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख हा वसा चालवत आहेत. वाळवा तालुक्यात मात्र काँग्रेसला खमके नेतृत्व नाही. बाळासाहेब पाटील यांनी तालुकाध्यक्षपद कायमस्वरूपी स्वत:कडे ठेवले आहे. त्यांच्या कार्यपध्दतीवर काही कार्यकर्ते नाराज आहेत. पेठनाक्यावरील महाडिक पिता—पुत्र गरजेनुसार काँग्रेसचा हंगामी वापर करतात. कामेरीचे सी. बी. पाटील आणि जयराज पाटील हे पिता-पुत्र वसंतदादा गटाचे आहेत. वाळवा-शिराळ्यात ते शिवाजीराव देशमुख यांचे नेतृत्व मानून काँग्रेसचे पाईक आहोत असे दाखवतात. वेळ पडल्यास माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम, मोहनराव कदम आणि विश्वजित कदम यांच्याशीही मिळते—जुळते घेऊन राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील काँग्रेसच्या माध्यमातून वाळवा तालुक्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्वत:चा वेगळा गट तयार केला आहे. बोरगाव गटात काँग्रेसचा किल्ला अभेद्य ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. इस्लामपूर शहरात वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार यांनी नावापुरता काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला आहे. युवक काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचा दावा विजय पवार करीत आहेत. त्यातच वाळव्याचे राजू वलांडकर यांनीही आपण युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहोत, असा दावा केला आहे. विजय पवार यांना यापूर्वीच अर्धचंद्र दिला आहे. त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस दुर्वीताई लकडे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ऋत्विक जोशी यांनी आपली निवड केली आहे, असे वलांडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
एकाच पदावर दोघे कार्यरत असल्याने युवक काँग्रेसमधील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. त्यातून तालुक्यातील काँग्रेसला खमक्या धनी नसल्याचे दिसून येत आहे.
कोण, काय म्हणाले?
सध्या आपणाकडे युवक काँग्रेसचे इस्लामपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपद आहे. राजू वलांडकर उपाध्यक्ष आहेत. त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फक्त ९0 दिवसांपुरते प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यभार दिला होता. त्यामुळे मीच अधिकृत अध्यक्ष आहे.
- विजय पवार,
अध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा युवक काँग्रेस.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने मोर्चे, निवेदने आणि तालुक्यात बैठका घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे धोरण अवलंबले होते. परंतु तालुकाध्यक्ष या नात्याने विजय पवार यांचा सहभाग नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी राजू वलांडकर यांना प्रभारी तालुकाध्यक्षपद दिले आहे.
- जितेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य.
बेधडक नेमणूकपत्र मिळविण्याचा सपाटा
तालुक्यातील काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता प्रदेश कार्यालयात जाऊन नेमणूकपत्र बेधडकपणे घेऊन येतो. यापूर्वी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या अभिजित पाटील यांना अर्धचंद्र देऊन वाळव्याचे नंदकुमार शेळके यांनी त्याजागी वर्णी लावून घेतली होती. आता अभिजित पाटील यांनी शिवसेनेची वाट धरली आहे, तर शेळके अज्ञातवासात आहेत. त्यांच्याकडून कोणतेही उठावदार काम झालेले नाही.