कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:40+5:302021-09-10T04:33:40+5:30
महापालिका क्षेत्रात सध्या दिलगिरी पॅटर्नची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. इस्लामपूर-पेठ रस्त्याच्या केविलवाण्या स्थितीवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. त्याची दखल घेत ...

कुजबूज
महापालिका क्षेत्रात सध्या दिलगिरी पॅटर्नची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. इस्लामपूर-पेठ रस्त्याच्या केविलवाण्या स्थितीवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. नेत्यांच्या दिलगिरीचे अनुकरण अनुयायांनीदेखील केले. मिरजेतील एका रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्याच्या प्रभागातील नगरसेवकानेही साहेबांच्या दिलगिरीचे अनुकरण केले. मतदारांची मनापासून माफी मागत असल्याचे व्हॉटसॲप ग्रुपवर जाहीर केले. मिरज पूर्व भागातील दोन मोठ्या गावांतही नेतेमंडळींच्या दिलगिरीचा महापूर आलाय.
वारुळाची सफाई हे पण नगरसेवकाचे काम?
सांगलीतील विस्तारीत भागात विद्यमान नगरसेवकावर पराभूत उमेदवार सातत्याने टीकेचे बाण सोडत असतो. गेल्या आठवड्यातही व्हाॅटसॲप ग्रुपवर त्याने टीकेची झोड उठवली. नगरसेवकाने प्रभागात काहीही विकासकामे केली नाहीत, किंबहुना नागपंचमीला वारूळदेखील साफ केले नाही, असे सांगितले. आता नगरसेवकासोबतच मतदारांनाही प्रश्न पडलाय, वारूळ साफ करणे हे काम नगरसेवकाच्या ड्युटीमध्ये बसते?