सांगली : उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना बेळगाव जिल्ह्यात सहा थांबे मंजूर केले असताना सांगली जिल्ह्यात केवळ दोनच थांबे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी, भिलवडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांनाही थांबा द्यावा, अशी मागणी सांगलीतील संघटनांनी केली आहे. जिल्ह्यातील स्थानकांबाबत दुजाभाव होत असल्याने संतापही व्यक्त करण्यात येत आहे.सांगलीच्या नागरिक जागृती मंचने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बंगळुरु-मुंबई एक्स्प्रेस व बंगळुरु-भगत की कोठी एक्स्प्रेस या गाड्यांना कर्नाटकात भरपूर थांबे दिले आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेने महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यात या गाड्यांना खूप कमी थांबे दिले आहेत. जेव्हा कोणतीही नवी रेल्वे गाडी सुरू होते त्यावेळी मध्य रेल्वेला स्वतःच्या क्षेत्रातील थांबे देण्याचा पूर्ण अधिकार असतो; पण काही वरिष्ठ अधिकारी भिलवडी व किर्लोस्करवाडी या महत्त्वपूर्ण स्टेशनवर थांबा देत नाहीत.त्यामुळे रेल्वे स्टेशन असूनही महाराष्ट्रातील प्रवासी रेल्वे सेवेपासून वंचित राहत आहेत. प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेला आवाहन केले आहे की, सर्व उन्हाळी गाड्यांना भिलवडी व किर्लोस्करवाडीत थांबा देऊन प्रवाशांचे हाल थांबवावेत.
दोन्ही गाड्यांना सहा थांबेबंगळुरु-मुंबई एक्स्प्रेस व बंगळुरु-भगत की कोठी एक्स्प्रेस या दोन्ही उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना कुडची, रायबाग, घटप्रभा, गोकाक रोड, लोंढा, बेळगाव अशा सहा स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात दोनच थांबेएकीकडे बेळगाव जिल्ह्यात अधिक थांबे दिलेले असताना सांगली जिल्ह्यात केवळ सांगली व मिरज अशा दोनच स्थानकांवर थांबा मंजूर केला गेला आहे.
जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी, भिलवडी हे दोन्ही रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहेत. याठिकाणी महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी आम्ही वारंवार करत असतो. तरीही मध्य रेल्वेकडून दोन्ही स्थानकांकडे दुर्लक्ष केले जाते. सांगली स्थानकावरही याबाबत अनेकदा अन्याय होतो. रेल्वेने हा दुजाभाव थांबवावा. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच