मिरज : तालुक्यातील बुधगाव येथील नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम किरकोळ कामे वगळता पूर्ण झाले आहे. तीस हजार लोकसंख्येच्या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपकेंद्राच्या उद्घाटनाचा नारळ कधी फुटणार असा सवाल आरोग्य सुविधेच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
बुधगावची लोकसंख्या ३० हजारपर्यंत पोहोचली आहे. मात्र, येथे आरोग्य सेवेची वानवा होती. गावातील लोकप्रतिनिधींनी आरोग्य सुविधेचा प्रश्न सोडविण्यासाठी गावात आरोग्य केंद्र होण्यासाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे पाठपुरावा केला. खासदार पाटील, आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नांतून भाजपा सरकारच्या काळात राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. शासनाने उपकेंद्रासाठी ५६ लाख ५४ हजार ६३० रुपयांचा निधीही देऊ केला. मात्र ठेकेदाराच्या उदासीनतेने हे काम वेळेत पूर्ण होण्याऐवजी अडीच वर्षांचा कालावधी लागला. काही किरकोळ कामे वगळता बांधकाम पूर्ण झाले आहे.
किरकोळ कामासाठी उपकेंद्र सुरू करण्यात अडसर निर्माण झाला असला तरी कोरोनाच्या महामारीत ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी उपकेंद्र सुरू करावे अशी मागणी आहे. मात्र, उपकेंद्र सुरू करण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने प्रशासन उपकेंद्राच्या उद्घाटनाचा नारळ कधी फोडणार असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
कोट
खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नांतून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारले आहे. कामे पूर्ण होऊनही ते सुरू करण्याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे. प्रशासनाने तातडीने उपकेंद्र सुरू न केल्यास आंदोलन करणार आहे.
- विक्रम पाटील
पंचायत समिती सदस्य, बुधगाव