सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी घुमणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:15+5:302021-07-11T04:19:15+5:30

वारणावती : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व तेथील वाघांचा अधिवास, खाद्य, वातावरण याचा अभ्यास ...

When will the fear of tigers roam in Sahyadri Tiger Reserve? | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी घुमणार कधी?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी घुमणार कधी?

वारणावती : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व तेथील वाघांचा अधिवास, खाद्य, वातावरण याचा अभ्यास गेल्या चार वर्षांपासून केला जात आहे. हा अहवाल आता अंतिम टप्प्यात असून, अहवाल सादर झाल्यानंतर वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आहे.

देशातील अन्य व्याघ्र प्रकल्पांतील वाघांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथे चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. भारतासह १४ देशांतील प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी होते. सध्या काही प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी जास्त आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रातील वाघ कमी संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रात आणून सोडण्यासह वाघांची संख्या व तिच्या संवर्धनासाठी आवश्यक बाबी यावर या बैठकीत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचा अभ्यास सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत प्रकल्प क्षेत्रात वाघांचे अस्तित्वच (२०१८ चा अपवाद वगळता) आढळून आले नाही. त्यामुळे प्रकल्पातील वाघ गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत होता. शासनाने व्याघ्र प्रकल्प घोषित केला; पण वाघाविनाच व्याघ्र प्रकल्प. अशी अवस्था झाली होती. पण आता भारतीय वन्यजीव संस्थेकडून अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर वाघांच्या पुनर्वसनामुळे सह्याद्रीत वाघ बघायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

चौकट

सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या हद्दीत चांदोली, कोयना, दाजीपूर अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्राचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. वाघांचे प्रमुख खाद्य असणाऱ्या सांबराची या परिसरात संख्या कमी आहे. त्यामुळे सांबर तसेच चितळ सागरेश्वर व कात्रज या ठिकाणाहून आणून प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे.

काेट

वाघांच्या पुनर्वसनासंदर्भात भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांचा अधिवास आणि खाद्य यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करत आहोत.

- उत्तम सावंत,

उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

Web Title: When will the fear of tigers roam in Sahyadri Tiger Reserve?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.