मोरणा धरणाची उंची वाढणार कधी?

By Admin | Updated: February 13, 2015 00:51 IST2015-02-13T00:25:08+5:302015-02-13T00:51:56+5:30

प्रस्ताव मंजूर : शासकीय यंत्रणेमुळे काम रखडले

When is the height of the morale dam? | मोरणा धरणाची उंची वाढणार कधी?

मोरणा धरणाची उंची वाढणार कधी?

विकास शहा - शिराळा  तालुक्यात डोंगरी विभागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असले तरी, या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवणूक करण्यासाठी धरणांची संख्या कमी असल्याने पाणी वाहून जात आहे. शिराळा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या मध्यम मोरणा धरण प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर असून, हे काम रखडले आहे. या प्रकल्पाची उंची वाढविणे गरजेचे आहे.
मोरणा प्रकल्पामुळे तसेच मोरणा नदीमुळे नदीलगतच्या गावांतील शेती फुलू लागल्याने शेतकरी समृध्द झाला आहे. १९८५-८६ मध्ये प्रथम पाणीसाठा करण्यात आला. त्यानंतर शिराळा शहराची प्रगती खऱ्याअर्थाने सुरु झाली. याअगोदर मोरणा नदी पावसाळ्यात भरुन वाहात असे. मात्र उन्हाळ्यात पिण्यास पाणी मिळत नसे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मोरणा धरणास मंजुरी मिळाली. १0१५ मीटर लांबी व ३१ मीटर उंचीच्या या धरणात 0.७५ टी.एम.सी. पाणीसाठा होत आहे. या धरणास चार कोटी खर्च आला. शेतीच्या पाणीपट्टीतून दरवर्षी पाटबंधारे विभागास पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
१९९४ मध्ये या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. त्यावेळी आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यामध्ये १00 मीटर रुंदीचा सांडवा १५७ मीटर रुंद करण्यासाठी दीड कोटी रुपये, सांडव्यात १२ बाय ३ मीटर आकाराचे ९ वक्राकार दरवाजे, त्याद्वारे पाणी साठ्याची सुमारे दोन मीटरने उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या सांडवा खुदाईत नियोजित दरवाजाच्या बांधकामाच्या पायासाठी खुदाई केल्याने धरणातील मूळ पाण्याची क्षमता कमी झाली. यानंतर विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी या सांडव्यात भिंत बांधली. गेल्या पाच वर्षात वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे काम सुरु झाल्याने या योजनेचे पाणी या धरणात येत आहे. ते मांगले गावापर्यंत पोहोचले आहे. आता या धरणाची उंची वाढविल्यास या धरणातील अतिरिक्त पाणी अंत्री, शिवणी धरणातून उचलून भटवाडी, बेलदारवाडी येथील पाझर तलावात सोडण्यात येईल.
वाढती लोकसंख्या, त्याबरोबरच वाढत जाणारी बागायत शेती याचा विचार केल्यास, पाण्याची मागणी वाढतच राहणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. अंत्रीपासून मांगले गावापर्यंत २५ कि.मी. मोरणा खोऱ्यातील २0 ते २५ गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीचे पाणी मिळून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. (वार्ताहर)

शेतकरी, नागरिकांना फायदा
सध्या १६0४ हेक्टर सिंचन क्षमता आहे. सांडव्यात दरवाजे बांधून उंची वाढविल्यास अर्धा टी.एम.सी. पाणीसाठा वाढविला आहे. १२६0 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. १ हजार १७१ द.ल.घ.फूट एकूण पाणीसाठा होऊन २८५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाटबंधारे खात्याने यापूर्वी भूसंपादन केलेले क्षेत्र बुडत नाही. त्यामुळे पाणीसाठा वाढल्यास नवीन जमीन भूसंपादन करावे लागणार नाही. धरणाची उंची वाढल्यास शेतकरी, नागरिकांचा मोठा फायदा होणार या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: When is the height of the morale dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.