उद्योगांचे चाक मंदावले, पन्नास टक्के कारखान्यांना कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:33+5:302021-05-10T04:25:33+5:30
सांगली : सांगलीच्या उद्योग क्षेत्राचे चाक सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे रुतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅकवर आलेली उद्योगांची गाडी ...

उद्योगांचे चाक मंदावले, पन्नास टक्के कारखान्यांना कुलूप
सांगली : सांगलीच्या उद्योग क्षेत्राचे चाक सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे रुतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅकवर आलेली उद्योगांची गाडी आता पुन्हा घसरली असून महापालिका क्षेत्रातील चार औद्योगिक वसाहतींमधील ५० ते ६० टक्के कारखाने बंद झाले आहेत. कामगारांच्या कामालाही यामुळे ब्रेक लागला आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण ६ औद्योगिक वसाहती असून महापालिका क्षेत्रातच यातील चार मोठ्या वसाहती आहेत. यात फूड प्रोसेसिंग, पशू खाद्य, स्टार्च, ग्लुकोज, फौंड्री, ऑटो कंपोनंट, टेक्सटाइल, गारमेंट, प्लास्टिक, सिमेंट आर्टिकल, फार्मास्युटिकल्स, हेवी फॅब्रिकेशन, शुगर मशिनरी, टेस्टिंग मशिन्स, केमिकल आदी विविध प्रकारच्या उद्योगांचा समावेश आहे. यातील अन्नप्रक्रियेसह अत्यावश्यक उद्योगांची चाके सुरळीत असून अन्य उद्योगांची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस येथील उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी महापूर आणि गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना येथील औद्योगिक क्षेत्रास करावा लागत आहे. महापुरातून सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच कोरोनाच्या संकटाची काळी छाया या क्षेत्रावर पडली. सुमारे १ हजार २00 कारखाने, २0 हजार कामगार आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेले १ हजाराहून अधिक छोटे व्यावसायिक या सर्वांना फटका बसला आहे.
चौकट
औद्योगिक वसाहती व सुरू उद्योग
वसंतदादा औद्योगिक वसाहत ५० टक्के
गोविंदराव मराठे ५० टक्के
कुपवाड एमआयडीसी ३० टक्के
मिरज एमआयडीसी ६० टक्के
कोट
कधीही भरून न येणारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान उद्योगांना सोसावे लागत आहे. शासनाने आता यातून सावरण्यासाठी भरीव मदत करावी, अन्यथा अनेक उद्योग कायमचे बंद पडतील.
- सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज
कोट
मिरजेतील निर्यातदार उद्योगांना कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा प्रश्न सतावत असून मुदतीत ग्राहकांना माल देणे अडचणीचे झाले आहे. वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
- गणेश निकम, व्यवस्थापक
सांगली, मिरज एम.आय.डी.सी. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
कोट
सध्या अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना उद्योजकांना करावा लागत आहे. कच्च्या मालाचे भाव जवळपास ४० ते ४५ टक्के वाढले आहेत. त्या मालाचाही व्यवस्थित पुरवठा होत नाही. त्यामुळे कारखान्यांची यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
- संतोष भावे, अध्यक्ष, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत