तडीपारीचा उपयोग काय? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:59+5:302021-09-12T04:30:59+5:30
सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या व विविध गुन्ह्यातील सहभाग असलेल्या गुन्हेगारांवर आता तडीपारीची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत ...

तडीपारीचा उपयोग काय? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच!
सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या व विविध गुन्ह्यातील सहभाग असलेल्या गुन्हेगारांवर आता तडीपारीची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. तडीपारीनंतरही शहरात वावरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा एकदा हद्दीबाहेर सोडण्यात येत असून, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तडीपारीचा नियमभंग करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
गुन्ह्यांमध्ये वारंवार पोलिसांची डोकेदुखी ठरत असलेल्या गुन्हेगारांवर कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार तडीपारीची कारवाई केली जाते. यात एका व्यक्तीसह टोळीलाही तडीपार करण्यात येते. जिल्ह्यात ही कारवाई नेहमीच करण्यात येते. तडीपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगारांना तीन जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. मात्र, अनेकवेळा तडीपारी धुडकावून लावत गुन्हेगार शहरातच आणि आपल्या घरातच ठाण मांडून असतात. अशांवर कारवाईसाठी एलसीबीने खास पथकाची निर्मिती केली आहे.
चौकट
३९ टोळ्या, २०२ जण तडीपार
विविध गुन्ह्यांखाली वारंवार पोलिसांच्या हाताला लागणाऱ्या व उपद्रव ठरत असलेल्या गुन्हेगारांना तडीपार केले जात असले, तरी आता त्यांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टोळ्याही तडीपार केल्या जात आहेत. त्यानुसार चार वर्षांत ३९ टोळ्या, तर २०२ जण तडीपार केले आहेत. अधीक्षक गेडाम यांनी अधिक कडक भूमिका घेत वर्षभरात ५ टोळ्या तडीपार केल्या तर १६ व्यक्ती तपडीपार केल्या आहेत.
चौकट
जिल्ह्यात फिरणाऱ्यांवर एलसीबीची नजर
* तडीपारीच्या कालावधीत बंदी घातलेल्या जिल्ह्यता प्रवेश करू नये असा नियम असतानाही, अनेक गुन्हेगार बिनधास्त वावरत असतात.
* हा नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी वर्षभर एलसीबीची टीम कार्यरत आहे.
* नियमभंग करणाऱ्या गुन्हेगाराने उपविभागीय अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेतली नसल्यास त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून त्यास हद्दीबाहेर सोडले जाते.
चौकट
कलम ५५ नुसार तडीपारीच्या कारवाया
वर्ष कारवाया
२०१८ ९४
२०१९ ७८
२०२० १४
२०२१ १६