शिराळ्याच्या विकासात ‘त्यांचे’ योगदान काय?
By Admin | Updated: June 8, 2015 00:49 IST2015-06-07T23:42:00+5:302015-06-08T00:49:14+5:30
मानसिंगराव नाईक : आमदारांवर टीका

शिराळ्याच्या विकासात ‘त्यांचे’ योगदान काय?
शिराळा : लोकप्रतिनिधींनी याअगोदर पंधरा वर्षांत शिराळ्यासाठी किती निधी दिला? पिण्याची पाणी योजना आम्ही आणली, त्यात राजकारण आणतात. या लोकप्रतिनिधींचे शिराळा शहरासाठी काय योगदान आहे? असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर टीका करताना केले.
येथील परीट समाजासाठी माजी आमदार नाईक यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिनकरराव शिंदे होते.
नाईक म्हणाले की, मी पाच वर्षांत प्रत्येक नागरिक तसेच प्रत्येक समाजाच्या सार्वजनिक गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने विकासकामे केली. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विकासकामांमध्ये खो घालून येथील जनतेस वेठीस धरण्याचे काम सध्याचे लोकप्रतिनिधी आणि काही मंडळी करीत आहेत. काही मंडळींनी याला आर्थिक स्वार्थही साधण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधींनी या शहरासाठी १५ वर्षांत कोणती कामे केली हे सांगावे.
याप्रसंगी अंनिसचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जोखे, बाबासाहेब परीट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच गजानन सोनटक्के, उपसरपंच बाबा कदम, पं. स. सदस्या संगीता परीट, महादेव कदम, अभिजित नाईक, विश्वास कदम, विश्वप्रतापसिंह नाईक, प्रमोद नाईक, बाळासाहेब पाटील, संभाजी गायकवाड, तुळशीदास परदेशी उपस्थित होते.
रमेश यादव यांनी स्वागत, अॅड. जे. डी. परीट यांनी प्रास्ताविक, तर अॅड. विलासराव झोळे यांनी सूत्रसंचालन केले. रत्नाकर कुंभार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कामे युद्धपातळीवर
शिराळा शहरासाठी एसटी बसस्थानक इमारत, शासकीय कार्यालय इमारत, अंबामाता मंदिर, गोरक्षनाथ मंदिर आदी ठिकाणचा विकास केला. पावसाची योजना व सर्व गावांतील रस्ते यासाठी जवळजवळ १० कोटींचा निधी आणला. आज ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.