शेती अवजारांच्या साठ्याचे गौडबंगाल काय?

By Admin | Updated: May 7, 2015 00:32 IST2015-05-07T00:26:24+5:302015-05-07T00:32:29+5:30

अकरा लाखांचे साहित्य : आटपाडी तालुक्यात कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; काळाबाजार चव्हाट्यावर

What is the storage of agriculture gadgets? | शेती अवजारांच्या साठ्याचे गौडबंगाल काय?

शेती अवजारांच्या साठ्याचे गौडबंगाल काय?

अविनाश बाड -आटपाडी : -शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या मोटारींच्या ६२ संचांचा काळाबाजार करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आता फसला आहे. मोटारींचे ६२ संच आलेले असताना, फक्त २० संच आल्याचे सांगून उर्वरित सुमारे १० लाख ५० हजार रुपये किमतीचे मोटारींचे ४० संच नेमके कुठे जाणार होते आणि ही रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जाणार होती, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
आटपाडीतील कृषी विभागाचा भ्रष्ट कारभार, तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांसाठी विहिरीतून पाणी उपसा करणाऱ्या आलेल्या मोटारींचे संच दडवादडवीतून स्पष्ट झाला आहे. जरी या विभागाकडे शेतकऱ्यांसाठी आलेले साहित्य ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसले तरी, ते आटपाडीपासून १० कि.मी. अंतरावर मुढेवाडी गावाच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी निर्जन ठिकाणी ठेवणे अपेक्षित नाही. शिवाय क्षणभर कृषी विभागाची बाबूंचे म्हणणे मान्य केले तरी, लाभार्थी शेतकऱ्यांना आटपाडीपासून १० कि.मी. दूर, जिथे कोणतेही छोटे वाहन जाणे मुश्किल आहे, त्याला भुर्दंड कशासाठी?, हा खरा प्रश्न आहे.
सध्या सुमारे १२ लाख रुपयांचे साहित्य सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही काळजी न घेता उघड्यावर ठेवले आहे. या साहित्याची चोरी झाली (किंवा दाखविली), तर कायदेशीर कारवाई काय व्हायची असेल ती होईल, पण शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
आटपाडीतील कृषी विभागाचे कार्यालय सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत भाड्याने आहे, पण ६२ मोटारी आणि त्यांचे साहित्य सुरक्षित ठेवता येईल, एवढी खोली अख्ख्या आटपाडीत मिळू शकत नाही, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.
आटपाडीतील अनेक ठिकाणच्या कुंपण घातलेल्या जागा आणि दुकानगाळे भाड्याने देणे आहेत, असे फलक अनेक ठिकाणी लावलेले असताना, कोणालाही समजणार नाही अशा निर्जन ठिकाणी हे साहित्य ठेवल्यामुळे ते काळ्याबाजारात विकले जाण्याची भीती तालुकावासीयांतून व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय प्रभारी कृषी अधिकारी आर. के. डोंबे हे जर फक्त मोटारींचे २० संच आल्याची माहिती ठामपणे वारंवार सांगत होते, तर मग त्यांनी मोटारींच्या संचांची संख्या जास्त का सांगितली नाही? यावरूनही कृषी विभागातील बाबू शेतकऱ्यांच्या अनुदानित मोटारींवर डल्ला मारणार होते, असा आरोप केला जात आहे.
कृषी विभागात गोदाम नाही म्हणून थेट डोंगर-कपारीत मोटारी ठेवल्याचे सध्या उघड झाले आहे. मात्र या विभागाने शेतकऱ्यांसाठी आलेले आजपर्यंतचे कडबाकुट्टी यंत्र, इंजिन आदी साहित्य कुठे ठेवले आहे, त्याचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे काय,
याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.


मोटारींसह सर्व साहित्य तिथून आटपाडीत आणून सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी हे साहित्य आले. कृषी विभागाकडे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम नाही. त्यामुळे पर्यवेक्षक विलास चव्हाण यांच्या शेतात ते ठेवले आहे. किती साहित्य आले, याची माहिती न घेता आमच्या कर्मचाऱ्यांनी २० मोटारी आल्याचे सांगितले, पण आता गटविकास अधिकाऱ्यांकडून रोहयोतून विहिरी पाडलेल्या शेतकऱ्यांची यादी घेऊन ४-५ दिवसात साहित्याचे वाटप केले जाईल.
- हणमंतराव होलमुखे,
तालुका कृषी अधिकारी, आटपाडी


कृषिमंत्र्यांना साकडे
शासनाने दिलेल्या मोटारी, इंजिन, कडबाकुट्टी यंत्र, जलवाहिन्या आदी साहित्याचे वाटप आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेले नाही. कृषी विभागातील अधिकारी ५ ते १० संच आल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवितात. सध्या ६२ मोटारी आणि साहित्य उघड्यावर पडले आहे. आजपर्यंत जे साहित्य आले, ते गरजूंपर्यंत पोहोचलेले नसून त्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Web Title: What is the storage of agriculture gadgets?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.