ऊस आंदोलन करणारे गप्प का?

By Admin | Updated: November 23, 2014 23:56 IST2014-11-23T23:11:15+5:302014-11-23T23:56:13+5:30

अजित पवार : कृष्णा साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

What is the silence of sugarcane agitation? | ऊस आंदोलन करणारे गप्प का?

ऊस आंदोलन करणारे गप्प का?

शिरटे : दरवर्षी ऊस दरासाठी आंदोलन करणारी मंडळी यावेळी गप्प का आहेत? शरद पवार कृषिमंत्री होते, म्हणून बारामतीत ठिय्या आंदोलन केले. आता कोठे करणार? असा सवाल उपस्थित करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला टार्गेट केले. याचवेळी त्यांनी, पुन्हा निवडणुका नकोत व जनतेच्या भल्यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याचेही स्पष्ट केले.
य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याच्या ५५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ व कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुण लाड, ‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते, राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जय हनुमान पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर उद्योगात ‘कृष्णा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ज्यांनी संस्थाच काढल्या नाहीत किंवा चालवल्या नाहीत, अशांनी साखरसम्राट, शिक्षणसम्राट म्हणून हिनविण्याचे काम केले. आज साखर उद्योगासमोर अनेक समस्या आहेत. एफआरपीनुसार दर देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची मदत महत्त्वाची असून, अजूनही त्यांच्याकडून आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना गतवर्षी एफआरपीप्रमाणे दर देता यावा यासाठी ६ हजार ६00 कोटी रुपये बिनव्याजी दिले होते. यावेळीही असेच अनुदान मिळणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. परंतु गेल्या ६ महिन्यांचा विचार केला, तर निर्यातीपेक्षा आयातच जास्त झाली असल्याने, देशासाठी हे घातक आहे. सहकारातील अनेक साखर कारखाने देशोधडीला लागले आहेत. त्यातच खासगी साखर कारखान्यांनी डोके वर काढले असून त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. ‘कृष्णा’च्या अध्यक्षांसारखा शांत व संयमी अध्यक्ष कोठेही पाहिलेला नाही. त्यांच्या डोक्यात सत्ता व खुर्चीची हवा नाही. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून निवडणूक जिंकली आहे. सभासदांचा विश्वास त्यांनी संपादन केला असून तो सार्थ ठरवावा, असा सल्लाही पवार यांनी अविनाश मोहिते यांना दिला.
‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, कारखाना सुरु करण्यास अवकाळी पावसामुळे विलंब झाला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोडीला प्राधान्य दिले असून याहीवर्षी गेटकेनचा ऊस आणला जाणार नाही.
प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. ‘कृष्णा’चे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव, पं. स. सदस्य सुनील पोळ, जयकर पाटील, सुभाष पाटील, जयश्री कदम, उमेश पवार, सुस्मिता जाधव, जयेश मोहिते, संचालक ब्रह्मानंद पाटील, संभाजी दमामे, नितीन खरात, सुभाष शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)

वसंतदादांची शोकांतिका
लोकहित डोळ्यासमोर ठेवून वसंतदादांनी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्याच कारखान्याला आज गाळप परवाना मिळू शकत नाही. देणी देण्यासाठी कारखान्याची जमीन विक्रीस काढावी लागत आहे, ही शोकांतिका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पतंगरावांना टोला
घाटावरील काहीजण ‘कृष्णा’चे धुराडे बंद पडेल असे म्हणत आहेत. परंतु हे धुराडे सभासदांच्या विश्वासावर असेच चालू राहणार, असे कृषिमित्र अशोकराव थोरात म्हणाले. तर घाटावरील भविष्यकारांनी काहीही भविष्य वर्तवले तरी, ‘कृष्णा’चे काहीही होणार नाही, असा टोला दिलीपराव पाटील यांनी पतंगराव कदम यांचे नाव न घेता लगावला.

Web Title: What is the silence of sugarcane agitation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.