सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झंोपलेत काय?
By Admin | Updated: June 13, 2016 00:07 IST2016-06-12T22:39:21+5:302016-06-13T00:07:54+5:30
प्रतीक पाटील : सिंचन कार्यालय स्थलांतरित होणे ही नाचक्की

सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झंोपलेत काय?
सांगली : कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडल कार्यालय बंद करून, ते यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात येणार असताना, सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झोपलेत का?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कृष्णेच्या पाण्याचे जीवनदायी वरदान मिळावे, म्हणून वसंतदादा पाटील यांनी या योजनेची निर्मिती केली होती. दुष्काळी भागासाठी वाढलेले मोकळे ताटही आता भाजप सरकारने काढून घेतले आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या योजना कायमस्वरुपी बंद करून केवळ विदर्भासाठी सिंचनाचे कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंचन योजनांची कार्यालयेच आता स्थलांतरित केली जात आहेत. म्हैसाळ, टेंभू योजना अद्याप अपूर्ण आहेत. या योजनांना अपेक्षित निधी देण्याचे सोडून सरकार या योजनाच गुंडाळत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळी पे्रमाचा आव आणणारे सत्ताधारी आमदार, खासदार गप्प का आहेत? त्यांनी याप्रश्नी लक्ष घालून हा निर्णय हाणून पाडावा, अन्यथा ‘आमच्याकडून काहीही होणार नाही’, असे त्यांनी जाहीर करावे. आम्ही या प्रश्नावर आंदोलन करून सरकारला जेरीस आणू.
केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी मोठा निधी मंजूर झाला होता. खासदारांच्या दुर्लक्षामुळे योजनेचा पैसा मिळाला नाही. अन्य कोणत्याही योजनेतून निधी आणण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. निधी नसल्याने आता योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. निधी आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी करायचे सोडून शासनाच्या प्रत्येक कृतीवर गप्प बसण्याची भूमिका स्वीकारली आहे.
म्हैसाळ योजनेमधून १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे आवश्यक असताना, अपूर्ण कामामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखली आले आहे. कवठेमहांकाळ, जत, सोलापूर, मंगळवेढा परिसरातील सर्व कामे अपूर्ण आहेत. ‘ताकारी’साठी शासनाकडून ६00 कोटी निधी अपेक्षित आहे. या योजनेतून २७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यायला हवे होते. अपुऱ्या कामांमुळे केवळ १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
नेत्यांची हतबलता : आंदोलन उभारणार
राज्यातील सिंचन योजनांच्या स्थलांतराबाबत इतका महत्त्वाचा निर्णय झाला तरी, भाजपचे आमदार, खासदार काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. इतके ते हतबल का आहेत? त्यांनी त्यांची हतबलता जाहीर करावी आणि आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतीक पाटील यांनी यावेळी केले.