सत्ताधाऱ्यांनी ३१ वर्षांत काय साधले?
By Admin | Updated: November 18, 2016 23:43 IST2016-11-18T23:43:07+5:302016-11-18T23:43:07+5:30
सदाभाऊ खोत : आता धार्मिक स्थळांना भेटी द्यायची तयारी करा ! इस्लामपुरात प्रचार सभा

सत्ताधाऱ्यांनी ३१ वर्षांत काय साधले?
इस्लामपूर : शहरवासीयांनी सत्ताधाऱ्यांना ३१ वर्षे एकहाती सत्ता दिली, तरीही विकासाच्या नावाने बोंबाबोंबच आहे. अजून आम्हाला सेवा करायची संधी द्या, अशी विनंती सत्ताधारी करत आहेत. मग तुम्हाला ३१ वर्षे गुरे राखायला सोडले होते काय? सत्ताधाऱ्यांनी आता सेवेसाठी पंढरपूर, शिर्डी, काशी अशा धार्मिक स्थळी जावे. त्यांच्या सेवेतून अपुरे राहिलेले शहराचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
इस्लामपूर येथे विकास आघाडीच्या प्रचारार्थ प्रभाग क्ऱ ६, ७, ८ व १२ मध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील, आघाडीचे विक्रम पाटील, जि. प़ सदस्य सम्राट महाडिक, राहुल महाडिक, मुकुंद कांबळे, दि़ बा़ पाटील, मुनीर इबुशे, भास्कर कदम, कपिल ओसवाल, नजीर वलांडकर, सतीश महाडिक उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, शहरातील दहशतीचे राजकारण यापुढे चालू दिले जाणार नाही़ मुस्लिम व दलित समाजाची धार्मिक कार्यक्रमापुरतीच आठवण येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनता स्वीकारणार नाही़ हिंदू-मुस्लिम ऐक्य असणारं हे शहर असून ३१ वर्षांच्या एकहाती राजवटीला सुरुंग लावायची वेळ आली आहे़ परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य प्रत्येक नागरिकाला लाभणार आहे.
जि़ प़ सदस्य सम्राट महाडिक म्हणाले, निशिकांत भोसले हे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार विकास आघाडीला लाभले, हाच पहिला विजय झाला आहे. दादांची दूरदृष्टी, सुसंस्कृत विचारच शहराचा विकास करु शकतात. यासाठी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.
यावेळी उमेदवार सौ़ आशा पवार, सत्यवान रासकर, सौ़ रूक्साना इबुशे, चेतन शिंदे, सौ़ अन्नपूर्णा फल्ले, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, सौ. रूपाली साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटले
सदाभाऊ खोत म्हणाले, अलीकडच्या दोन वर्षात राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यामुळे निधी आला नाही, असा आरोप सत्ताधारी करीत असले तरी, ३१ वर्षांच्या सत्ताकाळात काय दिवे लावले ? पालिकेच्या सत्तेच्या खुर्चीला मुंगळा चिकटावा, तसे कित्येक वर्षे चिकटून बसलात. तुमच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे.